Join us  

'नाच गं घुमा'चा पहिला Review आला समोर, 'आत्मपॅम्फ्लेट'चा दिग्दर्शक सिनेमा पाहून म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:42 AM

'नाच गं घुमा' पाहून मराठमोळा दिग्दर्शक आशिष भेंडेने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे (nach ga ghuma)

'नाच गं घुमा' सिनेमा उद्या १ मेला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. त्यानिमित्ताने काल सिनेमाचं स्पेशल स्क्रीनींग झालं. तेव्हा हा सिनेमा पाहून मराठीत गाजलेल्या 'आत्मपॅम्फ्लेट' सिनेमाचा दिग्दर्शक म्हणजेच आशिष भेंडेने सिनेमाविषयी खास पोस्ट लिहिलीय. आशिष लिहितो, "सिनेमा रिलीजला आला की त्याबद्दल त्या चित्रपटातील कलाकारांचे मित्र कौतुकाच्या पोस्ट्स करू लागतात. प्रेक्षकही सुजाण आहेत त्यांना सुद्धा आता हे प्रमोशन आहे ब्वा हे कळलेलं असतं. कालची पोस्ट थोडीफार तशी होती. पण ही पोस्ट त्यातली आजिबात नाही."

आशिष पुढे म्हणाला, "तर 'नाच गं घुमा' चं स्पेशल स्क्रिनिंग काल पाहिलं. काय सुंदर सिनेमा बनवला आहे आमच्या मित्रांनी. नेहमीप्रमाणे परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या जोडीने एक अप्रतिम चित्रपट बनवलेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक दृश्यात आपसूकच 'वाह' हे उत्स्फूर्तपणे येत होतं. प्रत्येकाला रिलेट होईल, आपली वाटेल पण तरीही एक वेगळा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे. खास मोकाशी शैलीचा.. हिट आहे पिच्चर!"

आशिष पुढे लिहितो, "सारंग साठे, छोटी मायरा, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे यांनी धम्माल उडवून दिलेली आहे, चित्रीकरणाच्या वेळेस तुम्हाला काय मज्जा आली असेल हे प्रत्येक दृश्यातल्या पिक्सल अन पिक्सल मधे जाणवत राहतं. आपल्या सर्वांच्या लाडक्या कै. नरेंद्र भिडेंचा सुपुत्र तन्मय भिडे या अवघ्या 22 वर्षाच्या मुलाने अप्रतिम संगीत/पार्श्वसंगीत दिलेलं आहे."

आशिष शेवटी लिहितो, "काल मुक्ता बर्वे न्हवती नाहीतर तिच्या बरोबर पण फोटो काढला असता. तिचा कमाल अभिनय, विनोद, इमोशन, कल्लोळ सगळंच भारी. मोठ्या पडद्यावर तिची भन्नाट राणी बघाच बघा. आणि ही आपली नम्रता संभेराव आपल्या सगळ्यांची नमा. व्हेंटिलेटर सिनेमात तिच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. तेंव्हापासून ती माझी एक फेव्हरेट अभिनेत्री आहे. पण तिच्या कुवतीचा रोल तिला आजपर्यंत मिळाला न्हवता असं वाटत राहतं. कॉमेडी तर ती झोपेतून उठून पण करेल. पण त्याचबरोबर या सिनेमातील आशाताई नावाचं पात्र तिने त्यातल्या बारीक बारीक जागा, मुद्राभिनय, श्वासोच्छ्वास, संवादफेक, देहबोली या सर्वाचा अप्रतिम वापर करत अक्षरशः जिवंत केलं आहे. Hats off to you नमा! धन्यवाद team नाच गं घुमा."

टॅग्स :मुक्ता बर्वेनम्रता आवटे संभेरावपरेश मोकाशी सुकन्या कुलकर्णीमराठी