Join us

पहिल्या गर्लफ्रेंडकडून मराठी शिकलो - अक्षयकुमार

By admin | Updated: March 12, 2016 13:46 IST

माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडकडून मी मराठी शिकलो असं हसत हसत सांगणाऱ्या अभिनेता अक्षयकुमारने एका मुलाखतीत संवेदनशील अभिनेत्याचे दर्शन घडवले

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडकडून मी मराठी शिकलो असं हसत हसत सांगणाऱ्या अभिनेता अक्षयकुमारने एका मुलाखतीत संवेदनशील अभिनेत्याचे दर्शन घडवले. लहान असताना बसमधून जाताना कंडक्टर काय बोलतोय ते मला कळायचं नाही, त्याचवेळी मी ठरवलं की मला मराठी आलं पाहिजे, आणि मी नंतर मराठी शिकलो असं तो म्हणाला.
शेतकऱ्यांसाठी, समाजातल्या गरजूंसाठी एकूण उत्पन्नातलं अर्ध उत्पन्न जरी खर्च झालं तरी मला वाईट वाटणार नाही असं सांगणाऱ्या अक्षयकुमारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्या समाजानं एकत्र येऊन तोडगा काढायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.
दुष्काळ व आत्महत्याग्रस्त शेतकरी यासंदर्भातल्या बातम्या वाचल्यानंतर नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंसारखंच अक्षयनेही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यासाठी हात पुढे केला.
संस्कार हे आईवडिलांकडूनच होत असतात हे सांगताना मला माझ्या वडिलांकडून हे संस्कार मिळाले आणि मीदेखील माझ्या मुलांना गरजूंना मदत करायला हवी हे सांगण्याचा प्रयत्न करतो असं अक्षय म्हणाला. आपण नशीबवान आहोत म्हणून आपल्याला भरभरून मिळालं आहे, परंतु ज्यांच्या पदरात कमी पडलंय त्यांना आपण मदत करायला हवी अशी भावना त्यानं व्यक्त केली.
जर कुठलीही व्यक्ती प्रामाणिकपणे विचार करेल तर हेच सांगेल की भारत हा अत्यंत सहिष्णू देश आहे असं तो म्हणाला. तसेच जुन्या चुकीच्या रुढ प्रथा परंपरा बंद व्हायला हव्यात असं आग्रही प्रतिपादनही त्यानं केलं. देव तुमच्याकडे काही मागत नाही, त्यामुळे त्याच्यासमोर नारळ फोडणं, तेल वाहणं हे बंद करायला हवं आणि या गोष्टी त्यांना द्यायला हव्यात ज्यांना त्याची गरज आहे, असं अक्षय म्हणाला.
तसंच, स्त्री आणि पुरूष समान आहेत, त्यांच्यात काही भेदभाव नाही, त्यामुळे जिथे जिथे पुरूषांना प्रवेश आहे तिथं तिथं महिलांना प्रवेश मिळायला हवा असं मत त्यानं शनिशिंगणापूर व अन्य मंदिरांमधल्या महिला प्रवेशबंदीसंदर्भात व्यक्त केलं.
केवळ एक चांगला अभिनेताच नाही, तर आपण एक चांगला पती आणि चांगला पिताही आहोत हे देखील अक्षयकुमारनं सिद्ध केलं आहे. टिव्ंकल खन्ना शुटिंगमध्ये व्यस्त असली की मुलांना सांभाळण्याचं काम अक्षय करतो, तसं टि्वट टि्वंकलनंच केलंय.