Join us  

सर्वाधिक बक्षीसं जिंकलेली पण 'सवाई' न ठरू शकलेली 'एकादशावतार'

By प्रसाद लाड | Published: February 03, 2019 8:15 PM

सध्याच्या घडीला संगोपनाची वृत्ती कोणामध्ये दिसत नाही, हा या एकांकिकेचा मूळ गाभा होता.

'एकादशावतार' या नावामधूनच ही एकांकिका कोणत्या बाजामध्ये सादर केली असेल, हे सांगायला नको. गोष्ट अतिशय साध्या पद्धतीने मांडली गेली असली तरी त्यामधला गर्भितार्थ बरेच काही सांगून जाणारा होता. यंदाच्या सवाई एकांकिका स्पर्धेत या एकांकिकेने सर्वाधिक चार पारितोषिके जिंकली, पण त्यांना अव्वल क्रमांक मात्र मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या 'एकादशावतार' या एकांकिकेला  पटकावता आला नाही.

प्रत्येक गावात, राजकारण आणि गट-तट असतातच. एखादा गट काही चांगलं करत असेल तर त्यामधली वाईट गोष्ट नेमकी कशी आणि कोणत्यापद्धतीने दाखवायची हे दुसऱ्या गटाला चांगलेच माहिती असते. गावामध्ये पहिल्यांदाच दशावतारी नाटक आलेले असते. या नाटकात सर्वात महत्वाची भूमिका विष्णू देवांची असते. पण या गावात येणाऱ्या रस्त्यावर आंदोलन सुरु असल्यामुळे विष्णू दशावतार संपेपर्यंत गावात पोहोचत नाही. त्यावरून दोन गटांमधली चढाओढ या एकांकिकेमध्ये दाखवली गेली.

ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण केली, विष्णूदेवाने तिचे पालन, संगोपन केले आणि शंकरदेवाने संहार केला, असे म्हटले जाते. सध्याच्या घडीला संगोपनाची वृत्ती कोणामध्ये दिसत नाही, हा या एकांकिकेचा मूळ गाभा होता. एकांकिकेमध्ये वृक्षारोपणाचा एक विषय येतो. त्यावेळी ते वृक्षारोपण किती वाईटपद्धतीने केले जाते, यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यासारखे बरेच प्रसंग आपल्याला संगोपन करण्यासाठी कुणीच दिसत नसल्याचे दाखवून जातात आणि अखेर संहारानेच एकांकिकेचा शेवट होतो. 

एकांकिकेचे सुरेख लिखाण प्राजक्त देशमुख यांनी केले होते, तर रणजित पाटील यांनी दिग्दर्शनाची भूमिका पार पाडली होती. एकांकिकेतील सर्व पात्रांनीच ही एकांकिका चांगलीच घोटवलेली होती, हे त्यांच्या अभिनयातून दिसत होते. या एकांकिकेसाठी रणजित पाटील यांना सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचे पारितोषित मिळाले. त्याचबरोबर सचिन गावकर यांना नेपथ्य आणि अमोघ फडके यांना प्रकाश योजनाकार हे पारितोषिक मिळाले. पण एकाही कलाकाराला पारितोषिक पटकावता आले नाही. लिखाण, दिग्दर्शन, अभिनय आणि अन्य तांत्रिक बाजू यांच्यामध्ये चांगला समन्वय होता. पण सवाई जिंकण्याचे स्वप्न मात्र त्यांचे छोट्याश्या फरकाने हुकले. 

टॅग्स :मुंबई