Join us  

'भाग्यवान आहे मी कारण...'; अनुजा साठेने पहिल्यांदाच सांगितले मनातील भाव

By शर्वरी जोशी | Published: October 27, 2021 7:45 PM

Anuja sathe: 'एक थी बेगम' या सीरिजच्या माध्यमातून तिच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवून दिली. या सीरिजचे दोन्ही भाग तुफान गाजले.

ठळक मुद्देअनुजाने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे (anuja sathe). 'एक थी बेगम' (ek thi begum) या सीरिजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेल्या अनुजाने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे रुपेरी पडदा गाजवलेल्या अनुजाने एक थी बेगम या सीरिजच्या माध्यमातून तिच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवून दिली. या सीरिजचे दोन्ही भाग तुफान गाजले. या सीरिजच्या निमित्ताने अनुजाने अलिकडेच 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने 'मी भाग्यवान' असल्याचं म्हटलं आहे.

एम एक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या 'एक थी बेगम' या सीरिजमध्ये कुख्यात डॉन दाउद इब्राहिमला जीवे मारण्याचा निश्चय करणाऱ्या सपनाचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. यात अनुजाने सपना म्हणजेच अश्रफची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अनुजाने केवळ ही भूमिका साकारलीच नाही तर ती जगलीदेखील त्यामुळे ही भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता हे तिने सांगितलं. 

"माझ्या करिअरमधील हा एक खूप मोठा बदल आहे. खूप प्रेम, कष्ट, कौतुक सारं काही मला एक थी बेगममुळे मिळालं. लोकांकडून मिळत असलेल्या या पोचपावतीनंतर एका कलाकाराला अजून काय हवं असतं. आपल्या कष्टाचं फळ व्हावं, लोकांनी कौतुक करावं हीच अपेक्षा असते. हा प्रवास एक कलाकार म्हणून माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. एक कलाकार म्हणून माझी प्रगती झाली", असं अनुजा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "जेव्हा आपल्याला आपल्या स्वभावानुसार एखादं कॅरेक्ट करायची संधी मिळते. त्यावेळी जास्त मज्जा येते. मी स्वत:ला भाग्यवान समजते. कारण, प्रत्येकालाच त्याला हवं तसं आवडीचं काम मिळतंच असं नाही. पण मला मनासारखं काम, दिग्दर्शक, सगळी टीम हवी तशीच मिळाली. जेव्हा असं काम करायला मिळतं त्यावेळी ती खूप पॉवरफूल फिलिंग असते. पण, त्याचसोबत जबाबदारीही वाढते. कारण जर आपल्याला दिलेलं काम नीट जमलं नाही तर लोक लगेच त्यावर मतमतांतरे तयार करतात. त्यामुळे आपण अजून प्रयत्न करायला हवे होते का असे प्रश्न मनात निर्माण होतात."

दरम्यान, सचिन दरेकर दिग्दर्शित एक थी बेगम या सीरिजचे दोन्ही भाग प्रदर्शित करण्यात आले. ही  सीरिज हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये अनुजा साठेसह अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिरसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदिप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर असे असंख्य दिग्गज कलाकार झळकले आहेत.

टॅग्स :अनुजा साठेसेलिब्रिटीवेबसीरिज