Join us  

उपचारामुळे मी टीबीमुक्त झालो - अमिताभ बच्चन

By admin | Published: December 22, 2014 3:21 AM

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची सुरूवात झाली, त्यावेळी मला टीबीची लागण झाली होती. मला टीबी झाला हे कळल्यावर ही मी हार मानली नाही.

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची सुरूवात झाली, त्यावेळी मला टीबीची लागण झाली होती. मला टीबी झाला हे कळल्यावर ही मी हार मानली नाही. मी मुंबईतच माझे उपचार पूर्ण केले. मी सगळी औषधे वेळेत घेतली आणि यामुळेच मला टीबीपासून मुक्तता मिळाली आहे. टीबी झाला कळल्यावर लोकांनी हार न मानता त्याचा सामना केला पाहिजे, असे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितले.रविवारी संध्याकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्षयरोग नियंत्रण जनजागृती मोहीमेअंतर्गत ‘टीबी हारेगा...देश जितेगा’ या अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जुहू येथे एका हॉटेलमध्ये झाले. या सोहळ््यात टीव्हीवरच्या जाहिराती, रेडिओ जिंगल्स आणि ४ पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आमच्यातर्फे अभियान राबविले जाणार आहे, पण त्यात लोकांचा सहभाग गरजेचा आहे. एखादे अभियान सुरू केल्यावर त्यात लोकांचा सहभाग असणे तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.देशातून टीबी उच्चाटन करण्यास सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो आहे, त्यांनी या विषयाकडे लक्ष घालावे. टीबी हटवण्याचा तुम्ही संकल्प करा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)