Join us  

डॉ. जयंत नारळीकर यांची निवड हा विज्ञान साहित्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 2:30 AM

विज्ञान लेखकांमध्ये आनंदाचे वातावरण

स्नेहा पावसकरठाणे : एका विज्ञान कथा, कादंबरीकाराची साहित्य संंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली ही बाब आमच्यासाठी खूपच आनंदाची आहे. विज्ञान साहित्याचा साहित्य विश्वाने मुख्य प्रवाहात उशिरा का होईना स्वीकार केला. यापूर्वी काहीसे दुर्लक्षित राहिलेले विज्ञान साहित्य आणि विज्ञान लेखकांना यामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळेल, असा आनंदी आणि आशावादी सूर ठाणे, पालघर, मुंबईतील विज्ञान लेखकांनी व्यक्त केला.

नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वैज्ञानिक, विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आणि विज्ञान विश्वात आनंदाचे वातावरण पसरले. नारळीकर यांच्या निमित्ताने संमेलनाला एक विज्ञानवादी नेतृत्व लाभल्याचे मत अनेकांनी व्यक्त करत नारळीकर यांचे अभिनंदन केले.

नारळीकर यांचे अतिशय घनिष्ठ संबंध असलेले व पालघर येथील ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनीही या निवडीबद्दल अभिनंदन करत विज्ञान प्रसारक असणाऱ्या आमच्यासारख्या लेखकांना प्रोत्साहन मिळाले. या निवडीने साहित्यातच काहीसे दुर्लक्षित राहिलेले विज्ञान साहित्य मुख्य प्रवाहात यायला हातभार लागेल. डॉ. नारळीकर यांच्या भाषणाने नवोदित लेखक प्रेरित होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साहित्य विश्वात विज्ञान साहित्य काहीसे दुर्लक्ष राहिले याचे प्रमुख कारण विज्ञान हा कठीण विषय आहे, असा गैरसमज सामान्यांमध्ये आहे. इतकेच नव्हे तर काही समीक्षक, विश्लेषकांनीही त्याकडे काहीसे किचकट विषय म्हणत दुर्लक्ष केले. मात्र माणसाला जगण्याची दिशा देण्यासाठीही विज्ञान साहित्य महत्त्वाचे आहे. माणसाला ज्या सुविधा मिळाल्या आहेत, त्या विज्ञानामुळेच. त्यामुळे या साहित्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विज्ञानाचेही दोन प्रकार आहेत. उपयोजित आणि मूलभूत. सोयी-सुविधा व त्याचा वापर हे उपयोजित विज्ञानाने दिले, मात्र मूलभूत विज्ञानातील दृष्टिकोन, निर्मिती याचे लेखन, वाचन याबाबत अनेकजण कंटाळा करतात. विज्ञानातील मूलभूत गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.

वाचनाबाबत ओढा कमी विज्ञान साहित्य दुर्लक्षित नाही, मात्र ते वाचनाबाबत लोकांचा ओढा कमी राहिला आहे. विज्ञान म्हटलं की लोक कंटाळतात, घाबरतात. परंतु गेल्या काही वर्षांत विज्ञान कथा हळूहळू वाचल्या जात आहेत. दिवाळी अंकांसाठी विज्ञान कथा मागविल्या जातात, असे मत विज्ञान लेखक सुबोध जावडेकर यांनी व्यक्त केले.

ललित साहित्यातून विज्ञानाला वेगळे स्थान  सात दशकात जे विज्ञानसाहित्य निर्माण झाले, त्या साहित्याचा सन्मान म्हणजे नारळीकरांना मिळालेलं संमेलनाध्यक्षपद आहे. नारळीकर हे फक्त वैज्ञानिक किंवा विज्ञान कथालेखक नाहीत, तर त्यांनी ललित साहित्यातून विज्ञानाला वेगळे स्थान दिले. विज्ञान साहित्य लिहिताना विज्ञान-कल्पित, विज्ञान-वास्तव आणि वास्तव- कल्पित यांची सांगड घातली आहे, असे प्रा. नितीन आरेकर म्हणाले.