कॉमेडी नाइट वुइथ कपिल या टीव्हीवरील गाजलेल्या हास्य कार्यक्रमातील ‘पलक’ला हरियाणा पोलिसांनी अटक केली. या कार्यक्रमातील एका भागात ‘पलक’ने म्हणजे किक्कू शारदा याने गुरमीत रामरहिमसिंग यांची चेष्टा करणारे विधान व हावभाव केल्याने, बाबांच्या चाहत्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ‘पलक’वर ठेवण्यात आला आहे. या घटनेची चौफेर निंदा होत आहे. शारदाने यासाठी माफीसुद्धा मागितली होती. तरीदेखील न्यायालयाद्वारे त्याला १४ दिवसांची न्यायिक चौकशीसाठी पाठविण्यात आले. मात्र, संध्याकाळपर्यंत शारदाला जामीन मिळाला आणि त्याला सोडण्यात आले. तरीही या घडलेल्या प्रकारावरून कित्येक लोक चिंतेत आहेत आणि याकडे अन्यायाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. मिमिक्री करणारे स्टॅँड अप कलाकार या आधीही अशा वादविवादात अडकले आहेत. राहुल गांधींपासून ते लालू प्रसाद यादवपर्यंत बरेच नेते आहेत, ज्यांंच्यावर अशा कार्यक्रमातून व्यंग करण्यात आले आहेत, परंतु इतक्या टोकाला कुणी जात नाही. १९९४ मध्ये एकदा असेच जॉनी लिवरच्या बाबतीत घडले होते, जेव्हा तो एका शोसाठी दुबईला गेला होता. तेथे जॉनीने जन गण मन.. वरून एक पैरोडी बनविली होती. ज्यावरून भारतात एवढ्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या की, तो परत येताच त्याला तत्काळ अटक करण्यात आली होती आणि काही वेळ त्याला जेलमध्येदेखील राहावे लागले होते.असेच स्टॅँड अप कॉमेडियन सुगंधा मिश्रासोबत घडले होते. सुगंधाने बऱ्याच कॉमेडी शोमध्ये लताजींच्या गायिकीच्या शैलीवरून आयटम सादर केले. मात्र, यावरून तिच्यावर लताजींच्या चाहत्यांच्या भावना दुखविण्याचा आरोप करण्यात आला आणि तिच्यावर गुन्हादेखील दाखल झाला. साउथमध्ये असे बरेच प्रकरण आहेत. काही दिवसांपूर्वी तेथे एका कॉमेडियनने तेथील मुख्यमंत्री जयाललितांवर व्यंग केले. त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. आपल्या शेजारील देश पाकिस्तानातदेखील कित्येक स्टॅँड अप कॉमेडियन्सला या प्रकारच्या विरोधाचे फटके बसले आहेत.
- anuj.alankar@lokmat.com