Join us  

डिनो मोरियाने 'तांडव'मधील प्रोफेसरच्या भूमिकेसाठी घेतली ही मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 2:49 PM

अभिनेता डिनो मोरिया 'तांडव'मध्ये झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आगामी अमेझॉन ओरिजिनल सीरिज 'तांडव'मध्ये झळकणार आहे. दिनो यात राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाची भूमिका करताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.  ही वेबसीरिज १५ जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

तांडवमधील प्राध्यापकाची भूमिका वास्तविक वाटण्यासाठी डिनो मोरियाने खूप मेहनत घेतली आहे. त्याने या भूमिकेचा अभ्यास केला आहे.  'तांडव'मध्ये मी एका राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाची भूमिका केली आहे आणि म्हणून मी प्राध्यापकांच्या व्यक्तिरेखा असलेले बरेच चित्रपट बघितले, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास केल्याचे तो सांगतो

डिनो म्हणाला, "मी बराच काळ स्क्रीनपासून दूर होतो, कारण माझ्या मते मला चांगल्या ऑफर्स येत नव्हत्या. अभिनय हे माझे पहिले प्रेम आहे आणि मला चांगली भूमिका मिळाली तर ती संधी मी कधीच सोडणार नाही. मला जेव्हा 'तांडव'ची ऑफर आली आणि पहिल्या वाचनातच मला कथानक खूप आवडले, तेव्हा मला अली अब्बास जफर यांच्यासोबत काम करण्याची संधी अजिबात सोडायची नव्हती. या शोमध्ये अनेक अष्टपैलू कलाकार आहेत. 

मला वाटते की, तांडवसारखी संधी आयुष्यात क्वचितच मिळते आणि म्हणूनच मी ती संधी घेतली. हा भारतातील पहिला राजकीय थरारपट असेल. 'तांडव हे शीर्षकही अत्यंत चपखल आहे, कारण यात प्रत्येकजण आपल्या लाभासाठी दुसऱ्याचे पाय खेचत आहे. हे कथानक वळणांनी आणि धक्क्यांनी भरलेले आहे. राजकीय तांडव या कथेच्या पार्श्वभूमीला असले तरी यात नातेसंबंधांतील जटीलताही दाखवली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना राजकारणात फारसा रस नाही, त्यांनाही हा शो बघायला खूप आवडेल, असे दिनो मोरिया सांगत होता. 

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांची निर्मिती असलेल्या या ९ भागांच्या राजकीय नाट्यामध्ये दमदार कलावंतांची फौज आहे.

सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, तिग्मांशु धुलिया, दिनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तुर, मोहम्मद झीशान अय्युब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनुप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागरानी आदींच्या भूमिका यात आहेत.

टॅग्स :डिनो मोरियासैफ अली खान