Join us  

मुसलमान व्यक्तीशी लग्न, राजकारणात येताच नावामुळे ट्रोल, दिपाली सय्यद म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 11:56 AM

दिपाली यांनी नुकतेच मुलाखत दिली.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे दिपाली सय्यद (Deepali Sayed). हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम करुन त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या त्या  शिंदे गटाच्या शिवसेनेत असून राजकारणात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. लवकरच दिपाली यांचा 'रुद्रा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिपाली यांनी नुकतेच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ट्रोलिंगवर भाष्य केलं.  ट्रोलिंगचा प्रचंड त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दिपाली यांनी नुकतेच "इट्स मज्जा" या युट्यूब चॅनेल मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राजकारणात आल्यावर आलेले अनुभव शेअर केले. त्या म्हणाल्या, 'राजकारणात सुरुवातीला काहीच इंटरेस्ट नव्हता. पण आपचं तिकीट आलं आणि सगळ्यांनी सांगितलं तुझ्यात ते गुण आहेत, तू करू शकते, तू कर. मग मी एकदम शेवटच्या क्षणाला मी हो म्हटलं. आणि मग बाप रे बाप, तेव्हा पहिल्यांदा मी ट्रोलिंगला सामोरी गेले. आज मी जेवढं सांगतेय ना की ट्रोलकडे लक्ष देऊ नका, तेव्हा मी लक्ष दिलं होतं. आणि तेव्हा मी भर पत्रकार परिषदेत रडले होते'. 

पुढे त्या म्हणाल्या, 'कारण इतकं ट्रोलिंग झालं होतं. एकतर माझ्या नावाला घेऊन ट्रोलिंग झालं होतं, मी मुसलमान व्यक्तीशी लग्न केलंय म्हणून ट्रोलिंग झालं होतं. त्या गोष्टीवरून मला कळलं राजकारण इतकं सोपं नाहीये. तेव्हा मी स्व:ताला सांगितलं की तुला खूप मजबूत व्हावं लागणार आहे. तुला तुझ्या हृदयाला इतकं निगरगट्ट बनवायला लागणार आहे ना, दगड बनवावं लागणार आहे'.

दिपाली म्हणाल्या, 'ट्रोलिंगकडे आता मी दुर्लक्ष करते. कारण, जेवढे मेसेज तुम्ही वाचालं तेवढा तुम्हाला त्रास होईल. ट्रोलर काय आहेत, त्यांना काही काम नाहीये. आजकाल गरीब आणि श्रीमंत दोघांकडेही मोबाईल आहे. सगळ्यांकडे काही नसेल तरी चालेल पण मोबाईल आहे. प्रत्येकाचं डोकं ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने ते टाइप करतात. त्यांच्याकडे मी आता लक्ष देत नाही.नाव ठेवणारे नाव ठेवतात. पण, तुम्ही तुमचं काम बंद करु नका'.

दिपाली सय्यद यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीला बंदिनी, समांतर या मालिकेत काम केले आहे. जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी त्या ओळखल्या जातात. मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून त्यांना मिळाली. तर  दिपाली सय्यद यांनी २००८ मध्ये बॉबी खान यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.  दिपाली आणि बॉबी खान यांना एक मुलगा असून त्याच नाव  अली सय्यद आहे. तो फोटोग्राफी करतो. दिपाली उत्तम राजकारणी, अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरदेखील आहेत.

टॅग्स :दीपाली सय्यदसेलिब्रिटीमराठी अभिनेताराजकारण