Join us

कोंदणात अडकलेला चित्रमय कोलाज!

By admin | Updated: April 11, 2015 01:57 IST

प्रेमकहाणीची गोष्ट यात उत्कटतेने रंगते खरी; मात्र तिला वास्तवतेच्या कोंदणात बसवल्याने हे ‘काकण’ उगाचच घरंगळत जाते.

आकाश, चंद्र, चांदण्या यांच्या सान्निध्यात रमणीय सैर सुरू असावी, त्यांच्याशी गुजगोष्टी करता करता भान हरपत जावे. यातून बाहेर पडू नये असे वाटत असतानाच कुणीतरी धक्का देऊन या स्वप्नातून जागे केले तर वाईट हे वाटणारच! पण भानावर आल्यावरही त्या माहोलाने पिच्छा सोडू नये, इतकी त्याची मनावर भूल पडलेली असू शकते. पण कितीही झाले, तरी या नंतरच्या वाटण्याला कल्पनारम्यतेची सर येऊ शकणार नाही. असेच काहीसे ‘काकण’ या चित्रपटाच्या बाबतीत घडल्याचे जाणवते. एका गोड प्रेमकहाणीची गोष्ट यात उत्कटतेने रंगते खरी; मात्र तिला वास्तवतेच्या कोंदणात बसवल्याने हे ‘काकण’ उगाचच घरंगळत जाते.कोकणातल्या एका गावात राहणारे किसू आणि सुधामती यांची ही गोष्ट आहे. एकमेकांशिवाय राहणे केवळ अशक्य आहे; अशा स्थितीपर्यंत हे दोघे पोहोचले आहेत. सुधा सुखवस्तू घरातली, तर किसू गरीब असल्याने सुधाच्या घरून या प्रेमाला विरोध आहे. पण त्याची पर्वा न करता किसू व सुधा यांच्या गावात भेटीगाठी होत राहतात. अशाच एका भेटीत सुधाच्या हातातले सोन्याचे काकण नदीत पडते आणि त्याची भरपाई करण्याचे वचन किसू सुधाला देतो. या खटपटीत तो तालुक्याच्या गावी जातो आणि ही संधी साधत सुधाच्या घरची मंडळी तिचे लग्न दुसऱ्याशी लावून देतात. किसू परतल्यावर साहजिकच त्याला याचा धक्का बसतो. त्याच्या आयुष्यातला सगळा रसच निघून जातो. ही या चित्रपटाची मूळ कथा असली, तरी तिला एक जोडकथाही आहे. किसूचा मित्र असलेला शाळकरी गोपी शहरात जाऊन सुधाचा पत्ता शोधतो आणि त्या दोघांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावतो. शेवटी किसू आणि सुधाचे आयुष्य कोणते वळण घेते, याची उत्कंठा तेवढी चित्रपटात शिल्लक राहते.क्रांती रेडकरचा चित्रपट दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि तिने हे ‘काकण’ तिच्या परीने पडद्यावर उमटवले आहे. एखाद्या उत्तम रंगसंगतीचा मेळ घातलेल्या चित्रासारखा हा चित्रपट पडद्यावर दिसतो आणि मनात उतरतो. चित्रपटाची कथा जमून आली असली, तरी चित्रपटाचा पूर्वार्ध आस्तेकदम पावले टाकतो. पण यातही किसू व सुधाची प्रेमकहाणी कोकणच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने रेखाटली आहे, त्यात गुंतायला होते. उत्तरार्धात चित्रपट वेग घेतो; पण त्यात मूळ प्रेमकहाणी बाजूला पडते आणि सुधाच्या शोधार्थ निघालेल्या गोपीवर अधिक फोकस राहतो. परिणामी, चित्रपटाच्या गाभ्याची सलगता हरवते. गोपी व त्याच्या मित्राच्या प्रसंगांना कात्री लावून प्रेमकहाणीवर जर अधिक लक्ष दिले असते, तर चित्रपटातली रंगत अजून वाढली असती. यातल्या शहरी श्रीमंतीपेक्षा, कोकणातल्या गावातली नैसर्गिक श्रीमंती अधिक सुखावते आणि त्यातच हरवून जावे, असे वाटत राहते. जितेंद्र जोशीला यात तरुणपणाचा किसू आणि वृद्ध किसू अशा दोन भूमिका आहेत. मात्र किसूला जख्ख म्हातारा दाखवताना काळाचे गणित लक्षात घेण्याचे राहून गेले आहे. पांढरेशुभ्र केस आणि भरघोस दाढी असा जख्खपणाचा मेक-अप केलेल्या जितेंद्रच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती असू नये ही सहज खटकण्याजोगी बाब आहे. जितेंद्रने या दोन्ही भूमिका रंगवल्या मात्र छान आहेत. पण त्याच्यापेक्षा ऊर्मिला कानेटकरने सुधा रंगवताना बाजी मारली आहे. प्रेमात आकंठ बुडालेली, गोड कोकणी हेल काढत बोलणारी, अवखळ, अल्लड अशी सुधा तिने चांगली साकारली आहे. आशुतोष गायकवाड याने गोपीची भूमिका वठवताना केलेल्या श्रमांचे चीज झाले आहे. माधवी जुवेकर, अशोक शिंदे यांनी त्यांना मिळालेल्या छोट्या भूमिकाही लक्षात राहण्याजोग्या केल्या आहेत. कोकणच्या पार्श्वभूमीवरचे चित्रपटाचे छायांकन नेत्रसुखद आहे. तशीच गाणी ओठांवर सहज रेंगाळणारी आहेत. मात्र उत्तम कॅनव्हास घेऊन आकर्षक रंगांची पेरणी करावी; परंतु मधूनच त्यातला एखादा रंग ओघळत जावा, असे चित्र हा चित्रपट रेखाटतो आणि एक चांगला कोलाज होता होता राहून जातो.