- Benzeer Jamadar
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधून अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मराठीमध्ये नटरंग, राजवाडे अॅण्ड सन्स, हॅपी जर्नी, तर बॉलिवूडमध्ये हे राम, दिल्ली ६, अशा अनेक चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे. आता, तो पहिल्यांदाच प्रेक्षकांना आझाद या हिंदी लघुपटातून पाहायला मिळणार आहे. त्याच्या या पहिल्या हिंदी लघुपटाविषयी त्याने ‘लोकमत सीएनएक्स’शी साधलेला मनमोकळा संवाद.या लघुपटात तुझी भूमिका काय आहे?- या लघुपटात मी आझादची भूमिका साकारतोय. मी एका ठिकाणी नोकरी करत असतो. मात्र मला माझे विचार, मत ठामपणे मांडता यावे यासाठी नोकरी सांभाळून पत्रकारची नोकरीदेखील करतो. पत्रकारितेची नोकरी करत असताना मी वेगवेगळ्या मुद्द्यांवर लिहीत असतो. माझ्या या ठामपणाच्या भूमिकेमुळे मला कित्येक वेळा धमकीलादेखील सामोरे जावे लागत असे. मात्र मी कशाचीही पर्वा न बाळगता त्याविरुद्ध लिहीतच राहतो.
चित्रपट आणि लघुपट यामध्ये काय फरक जाणवला?- चित्रपटाच्या तुलनेत लघुपटामध्ये वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये कथा मांडायची असते. त्यामुळे कलाकाराच्या वाटेला लघुपटात खूप कमी सीन्स येत असतात. दिग्दर्शक आणि लेखकाला खूप कमी वेळ मिळतो. त्या वेळेतच त्यांना आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो. हे एक मोठे आव्हानच असते. त्याचबरोबर अभिनयदेखील फार कमी वेळेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असतो. माझा हा पहिलाच लघुपट असल्यामुळे माझ्यासाठी एक खूप वेगळाच अनुभव होता.
तुझा हा पहिलाच लघुपट असल्यामुळे यासाठी काही विशेष तयारी केली होतीस का?- हो करावी लागली, कारण यापूर्वी अनेक चित्रपट केले होते. पण लघुपट हा पहिल्यांदाच करत असल्यामुळे त्याची थोडी वेगळी तयारी करावी लागली. खरे सांगू का पहिल्यांदा लघुपटाचा फॉरमॅट दिग्दर्शकाकडून समजून घेतला. तसेच त्यांच्यासोबत बसून भूमिकेविषयी चर्चा करून ती जाणवून घेतली.
साक्षी तन्वर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- साक्षी आणि मी लघुपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्रित काम करीत आहोत. साक्षीसोबत या लघुपटात माझे दोनच सीन्स आहेत. तिच्याबरोबर काम करताना जाणवले, की साक्षी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिचा चेहरा अत्यंत बोलका आहे. तसेच काम करताना जर सहकलाकार हा प्रोत्साहन देणारा असेल तर तुम्हाला काम करताना उत्साह मिळतो याची जाणीव झाली.