ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: कमाईची दंगल केली आहे. 'दंगल' चित्रपटाने फक्त पाच दिवसांमध्ये तब्बल 155 कोटींची कमाई केली आहे. 100 कोटींची टप्पा तर चित्रपटाने फक्त तीन दिवसांमध्ये पार केला होता. आमीरच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले असून नवनवीन विक्रम केले आहेत. यासोबतच आमीर खानच्या 100 कोटी क्लबमध्ये अजून एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. याआधी गजनी, धूम, 3 इडियट्स आणि पीके चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या दंगलने पहिल्याच दिवशी 29.78 कोटींची कमाई केली. शनिवारी 34.82 आणि रविवारी 42.35 कोटींची कमाई करत तीनच दिवसात चित्रपटाने 100 कोटी पुर्ण केले. यानंतर सोमनारी 25.48 तर मंळवारी 23.07 कोटींची कमाई करत 155.53 कोटी कमावले आहेत.
'दंगल' चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारताना दिसत असून त्याने घेतलेल्या मेहनतीचं कौतूक केलं जात आहे. सोबतच इतर अभिनेत्यांनीही चांगलं काम केल्याची पावती प्रेक्षकांकडून मिळत आहे. चित्रपटात महावीर फोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.
याशिवाय ‘दंगल’च्या एका विक्रमाचीही चर्चा होतेय. हा विक्रम म्हणजे, बॉलिवूडमध्ये एकाच वेळी चार नव्या चेहऱ्यांना लॉन्च करण्याचा. आमिर खान प्रॉडक्शनच्या ‘दंगल’मधून एकाच वेळी चार नव्या अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच केले गेले आहे. या अभिनेत्री आहेत, फातिमा सना शेख, झायरा वसिम, सान्या मल्होत्रा आणि सुहानी भटनागर. या चारही अभिनेत्रींनी गीता आणि बबीता यांच्या भूमिका केल्या आहेत हे विशेष. तारूण्यातील गीता फोगटची भूमिका फातिमा सना शेख हिने केली आहे, तर बालपणीची भूमिका झायरा वसिम हिने साकारलीयं. तारूण्यातील बबीताची भूमिका सान्या मल्होत्रा तर बालपणीची भूमिका सुहानी भटनागर हिने केलीय. नवा चेहऱ्यांसोबत काम करण्याचा आमिरचा प्रयोगही यशस्वी ठरला आहे. आठ वर्षांपूर्वी आमिर खान प्रोडक्शनने नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती.