Join us  

'आता कधीच तुझा फोन येणार नाही..', सुशांतच्या आठवणीत भावूक झाला दिग्दर्शक मुकेश छाब्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 1:37 PM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला एक महिना आज पूर्ण झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला एक महिना आज पूर्ण झाला आहे. सुशांतने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. 14 जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनामुळे फक्त चाहत्यांनाच नाही तर कलाकारांनादेखील धक्का बसला होता. सुशांतच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर व डिरेक्टर मुकेश छाब्राने ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले की आता तर कधीच तुझा फोन येणार नाही. मुकेश छाब्राचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा देत मुकेश छाब्राने ट्विट केले की, आज एक महिना झाला, आता तर कधीच फोन नाही येणार तुझा.

मुकेश छाब्राच्या या ट्विटवर सोशल मीडिया युजर खूप कमेंट करत आहेत. सुशांतच्या निधनानंतर त्याचे चाहते सातत्याने या प्रकरणाची तपासणी सीबीआयने करावी अशी मागणी करत आहेत. याशिवाय त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर घराणेशाहीवर देखील खूप टीका झाली होती. तसेच सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित करण्याची मागणीदेखील चाहत्यांनी केली होती.

सुशांतला 2008 मध्ये टीव्हीवर पहिला ब्रेक बालाजी टेलीफिल्म्सचा शो 'किस देश में है मेरा दिल'मध्ये मिळाला. परंतू, त्याला खरी ओळख 2009 ते 2011 दरम्यान आलेली मालिका 'पवित्र रिश्ता'मधून मिळाली. साचेबद्ध काम करण्यात रस नसून वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्न करणा-यापैकी सुशांत होता. त्यानंतर सुशांतला 2013 मध्ये बॉलिवूडचा पहिला चित्रपट 'काई पो छे' मिळाला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते.

या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता. सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत