Join us  

लाहोरमध्ये जन्मलेल्या यश चोप्रांना व्हायचं होतं इंजिनियर, पण...; किंग ऑफ रोमान्स ठरलेल्या दिग्दर्शकाची बॉलिवूडमध्ये अशी झाली एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:22 AM

अमिताभ बच्चन, शाहरुख खान सारखे स्टार बनवण्यात यश चोप्रा यांचा मोठा वाटा आहे.

यश चोप्रा आज आपल्यात नाहीत. पण यश चोप्रांचे सिनेमे मात्र कुठलाच बॉलिवूडप्रेमी विसरू शकत नाही. यश चोप्रा यांना रोमान्सचा किंग म्हटले जाते. इत्तेफाक, दाग, लम्हे, चांदनी, दिल तो पागल है, वीरलारा असे अनेक चित्रपट त्यांनी दिले.  यश चोप्रा यांनी अनेक रोमॅन्टिक चित्रपट बनवलेत. सोबतच आपल्या सिनेमातून अनेकांना स्टारडम मिळवून दिले. अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले, याचे श्रेय निश्चितपणे यश चोप्रा यांना जाते. यश चोप्रा यांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधीत काही रंजक किस्से. 

यश चोप्रा यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३२ ला लाहोरमध्ये झाला. त्यांनी लाहोरमध्ये शिक्षण घेतले. 1945 मध्ये त्यांचे कुटुंब पंजाबमधील लुधियाना येथे स्थायिक झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहिले.  इंजिनीअरिंग शिकण्यासाठी ते लंडनलाही जाणार होते, पण त्यांच्या नशिबी काहीतरी वेगळेच लिहिले होते. त्याकाळात ते चित्रपटांच्या प्रेमात पडले आणि चित्रपटांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले.

त्यांनी त्यांचा भाऊ बलदेव चोप्रा यांच्यासोबत काम केले, जो त्यावेळी दिग्दर्शक आणि निर्माता होता. त्यांनी आपल्या भावासोबत अनेक चित्रपट केले, जसे - 'धूल का फूल', 'वक्त', 'धर्मपुत्र' आणि 1971 मध्ये त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस 'यशराज फिल्म्स' सुरू केले. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दाग' या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. पटकावला. दोन वर्षांनंतर त्यांनी दीवार सिनेमा बनवून आपलं नाव इतिहासात नोंदवले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला.

अमिताभ बच्चन, शाहरुख खान सारखे स्टार बनवण्यात यश चोप्रा यांचा मोठा वाटा आहे. जेव्हा बिग बी यांची कारकीर्द डगमगू लागले होते तेव्हा यश चोप्रा यांनी त्यांना आधार दिला. यश चोप्रा यांनी बिग बींसाठी ‘मोहब्बतें’ बनवला. या सिनेमात अमिताभ यांच्यासह शाहरूख खान, ऐश्वर्या राय, उदय चोप्रा, शमिता शेट्टी, किम शर्मा असे अनेक कलाकार होते. पण या चित्रपटातील बिग बींची भूमिका खूप महत्वाची होती. स्क्रिप्ट वाचताच बच्चन यांनी होकार भरला. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना चांगल्या कामाच्या आॅफर येऊ लागल्या आणि बच्चन कुटुंबाचे आयुष्य रुळावर आले.  

यश चोप्रा यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. पण या घोषणेनंतर ते महिनाभरही कुटुंबासोबत शांत बसू शकले नाही. ‘जब तक है जान’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पुन्हा वापसी केली. त्यांच्या याही चित्रपटात शाहरूख खानचीच वर्णी लागली.  त्यापूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेला २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वीरजारा’ त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यातही शाहरूख खान हाच लीड रोलमध्ये होता. 

टॅग्स :यश चोप्रा