Join us

आजारपणाचे गूढ वाढत असतानाच इरफान खानचा ‘हा’ फोटो आला समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 20:21 IST

अभिनेता इरफान खान हा एका गंभीर आजाराशी लढा देत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. मात्र त्याला नेमका कोणता आजार झाला, हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.

अभिनेता इरफान खान याच्या आजारपणामुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, त्याच्या दीर्घायुष्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. इरफानला नेमका कोणता आजार झाला याबद्दलचे गूढ अजूनही कायम असून, त्याने लवकर बरे होऊन पडद्यावर जबरदस्त कमबॅक करावे, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान, इरफानचा आता एक फोटो समोर आला असून, तो बघून त्याच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. इरफानने काही दिवसांपूर्वीच एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. आता या मॅगझिनचा अंक प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यामधील इरफानचा फोटो बघून अनेकांना दिलासा मिळत आहे. कारण मॅगझिनवरील फोटोत इरफानचे एक्सप्रेशन बघून कोणीच अंदाज लावू शकत नाही की, तो आतमधून त्या आजाराला लढा देत असेल. एवढा त्रास असतानाही ज्या पद्धतीने इरफानने प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण केली, ती खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. ‘मॅन्स वर्ल्ड’ नावाच्या या मासिकाने मार्च २०१८ चा अंक लॉन्च करताना लिहिले की, ‘आजारपणाची दु:खद बातमी शेअर करण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच इरफान खानने जवळपास अर्धा दिवस आमच्यासोबत व्यतीत केला. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये फोटोग्राफी सेशन झाले होते. त्यावेळी तो पूर्णपणे स्वस्थ दिसत होता.’ पुढे मॅगझिनने लिहिले की, आजारपणाविषयी खुलासा करण्याअगोदर इरफानचे फोटो मॅगझिनवर छापण्यात आले होते. या आजारपणातून त्याने एखाद्या फायटरप्रमाणे पुढे यावे याच आमच्या शुभेच्छा’ दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इरफानने ट्विटरवर खुलासा केला होता की, तो एका भयंकर आजाराशी लढा देत आहे. वास्तविक आतापर्यंत त्याच्या आजारपणाबद्दलचा कुठलाही खुलासा समोर आलेला नाही. त्यामुळे सध्या सर्वत्र अफवा पसरविल्या जात आहेत. वाढत्या अफवा बघून इरफानची पत्नी सुतपा सिकदरने एक पोस्टच्या माध्यमातून लोकांना अफवा न पसरविण्याची विनंती केली आहे. फेसबुकवरील एका लांबलचक पोस्टमध्ये सुतपाने लिहिले की, ‘इरफानला काय झाले हे जाणून घेण्यासाठी तुमच्यातील अनमोल ऊर्जा उगाचच वाया घालवू नका. माझा सर्वात चांगला मित्र आणि जोडीदार एक यौद्धा आहे. तो जबरदस्त अंदाजात या संकटाचा सामना करीत आहे. तुमच्या संदेशाचे अन् कॉलचे उत्तर न दिल्याबद्दल मी माफी मागते. परंतु मी जगभरातून इरफानच्या दीर्घायुष्यासाठी केली जात असलेली प्रार्थना, चिंता आणि शुभेच्छासाठी कायम ऋणी राहणार आहे. नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला अभिनेता इरफान खानचा ‘ब्लॅकमेल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात दिव्या दत्ता, अरुणोदय सिंग, ओमी वैद्य, प्रद्युम्न सिंग आणि गजराज राव बघावयास मिळणार आहेत. हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.