Join us  

पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तीन मुलींच्या भन्नाट आयुष्यावर आधारित वेबसीरिज 'निम्मीज पीजी'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 9:09 PM

'निम्मीज पीजी' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'निम्मीज पीजी' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज हंगामा प्ले या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पहायला मिळत आहे. पेइंग गेस्ट (पीजी)साठी असलेल्या घरात ही कथा घडते. कुणाचीही पर्वा न करणाऱ्या बिनधास्त स्वभावाच्या तीन सिंगल मुली आणि त्यांच्यासोबत त्यांच्याइतकीच भन्नाट मालकीण यांचे आयुष्य यात पहायला मिळेल. त्यांच्यातील 'अँटिकपणा' त्यांना नेहमीच विचित्र परिस्थितीत आणून ठेवतो. यातील या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखांमुळे हा शो प्रेक्षकांसाठी हास्याची पर्वणी ठरणार आहे. निम्मीज पीजीचं दिग्दर्शन नितेश सिंग यांनी केलं आहे.

दिल्लीत निम्मी आंटीच्या घरात तीन सिंगल मुली पेइंग गेस्ट म्हणून राहत आहेत. या तिघींसाठी ही राहण्याची एक साधीशी, शांत, सरळमार्गी जागा असू शकते... पण नेमकं तेच नाही. लेट नाईट पार्ट्या ते मूर्ख बॉयफ्रेंड्स, भयंकर गैरसमज ते गुपितं लपवणं या सगळ्यांमुळे या मुलींचे पीजीमध्ये राहणे म्हणजे एकुणच 'सियाप्पा' आहे. आणि हो, निम्मी आंटीलाही यातून वगळायला नको. गॉसिपिंग आणि पटियाला पेग हेच तिला आवडतं असं नाही. आयुष्यात जराशी गंमत आणण्यासाठी ती सट्टेबाजीचा तडकाही अधूनमधून देत असते. 

 या शोबद्दल हंगामा डिजिटल मीडीयाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, "निम्मीज पीजीमध्ये तरुणाईवर भर दिलेला असला तरी ती भन्नाट विनोदी कथा या लक्ष्यित वयोगटापलिकडील प्रेक्षकांनाही ती आवडेल आणि ते या कथेशी समरस होऊ शकतील."या शोबद्दल नितेश सिंग म्हणाले, "हा शो म्हणजे धमाल आहे. बहुतांश सिंगल भारतीयांना त्यांच्याच आयुष्यातील प्रसंग वाटतील अशा घटनांवर यात हलकेफुलके भाष्य आहे. यातील व्यक्तिरेखा अजब परिस्थितीत सापडतात आणि त्यावरील त्यांच्या प्रतिक्रिया धमाल विनोदी असतात ज्या तुम्ही वीकेंडला पाहू शकाल. प्रेक्षकांना अजिबात कंटाळवाणे वाटणार नाही असे काम करण्यात प्रचंड यशस्वी ठरलेल्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम केल्याचा मला आनंद आहे. आता प्रेक्षकांच्या प्रतिसादाची मला उत्सुकता आहे."

या शोमध्ये नताशा फुकन, आंचल अग्रवाल, मीनू पांचाल, कुलबीर बदरसन आणि भावशील सिंग साहनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.