Join us

विनोद खन्ना रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 20:47 IST

प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने दिग्गज अभिनेता तथा नेता विनोद खन्ना यांना दक्षिण मुंबई येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अ‍ॅण्ड ...

प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने दिग्गज अभिनेता तथा नेता विनोद खन्ना यांना दक्षिण मुंबई येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार विनोद खन्ना यांना गेल्या शुक्रवारीच दाखल केले गेले. विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्ना याने याबाबतचा अधिक खुलासा करताना सांगितले की, डॅडला डिहायड्रेशनची समस्या जाणवत असल्याने त्यांना शुक्रवारीच अ‍ॅडमिट केले गेले. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. आमचा पूर्ण परिवार डॉक्टरांनी घेतलेल्या परिश्रमांचे आणि हॉस्पिटलच्या सुविधांबाबत आभारी आहे. गेल्या गुरुवारी विनोद खन्ना यांच्या आगामी ‘एक राणी ऐसी भी’चे ट्रेलर लॉचिंगचा इव्हेंट ठेवण्यात आला होता. या इव्हेंटसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महानायक अमिताभ बच्चन उपस्थित होते. असे म्हटले जात आहे की, प्रकृती अस्वास्थ्य असल्याकारणानेच विनोद खन्ना या इव्हेंटला उपस्थित राहू शकले नाहीत. सुरुवातीला ते उपस्थित राहतील असे सांगितले गेले. परंतु नंतर अचानकच त्यांचे येणे अनिश्चित असल्याचे सांगितले गेल्याने त्यांच्या प्रकृतीतील अस्वस्थपणा हेच एकमेव कारण असल्याचे सांगितले जात आहे. ‘एक राणी ऐसी भी’ या चित्रपटात विनोद खन्ना आणि हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत आहेत. ७० वर्षीय विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शिवाय राजकारणातही ते सक्रिय आहेत. भाजपाकडून ते गुरुदासपूर मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवाय केंद्र सरकारच्या एका महत्त्वपूर्ण मंत्रालयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.