Join us  

अंडरवर्ल्डच्या भीतीने रातोरात गायब झाली होती ही अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:06 PM

वीराणा हा हॉरर चित्रपट एकेकाळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील जॅस्मिन या नायिकेला त्या काळात चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

ठळक मुद्देजॅस्मिनच्या बाबतीत असे म्हटले जाते की, तिच्या सौंदर्यावर एक अंडरवर्ल्डचा डॉन फिदा झाला होता. तिला तो रोज फोन करायचा... तिच्यामागे तो लागला होता.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळतात. काही कलाकार प्रसिद्ध होतात तर काही कलाकार अभिनयक्षेत्रापासून कायमचे दूर होतात. नव्वदीच्या दशकात आपल्याला अनेक हॉरर चित्रपट पाहायला मिळाले होते. त्याकाळात हॉरर चित्रपटांची चलती होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. रामसे बंधूने बॉलिवूडला अनेक हिट हॉरर चित्रपट दिले. रामसे बंधू यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना ऐंशी-नव्वदीच्या दशकात पाहायला मिळाले होते. या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला एक अभिनेत्री पाहायला मिळाली होती. ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर असून तिच्याविषयी कोणालाच माहिती नाहीये. अंडरवर्ल्डच्या भीतीने तिने अनेक वर्षांपूर्वी भारतातून पळ काढला असल्याचे म्हटले जाते.

वीराणा हा हॉरर चित्रपट एकेकाळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील जॅस्मिन या नायिकेला त्या काळात चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात या नायिकेने भूताची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या अभिनेत्रीला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तिने यासोबतच बंद दरवाजा, डाक बंगला, पुरानी हवेली यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून गायब असून तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तिच्याविषयी कोणाकडेच काहीही माहिती नाहीये.

जॅस्मिनच्या बाबतीत असे म्हटले जाते की, तिच्या सौंदर्यावर एक अंडरवर्ल्डचा डॉन फिदा झाला होता. तिला तो रोज फोन करायचा... तिच्यामागे तो लागला होता. या सगळ्यामुळे जॅस्मिन इतकी घाबरली की, तिने भारत देशच सोडला आणि ती परदेशात राहायला गेली... तेव्हापासूनच ती कोणाच्याही संपर्कात नाहीये. सध्या ती कुठे राहाते, काय करते हे कोणालाच माहीत नाहीये... जॅस्मिनने लग्न करून ती परदेशातच सेटल झाली असे काही जण म्हणतात तर काहींच्या मते ती या जगातच नाहीये... तिच्या अनेक फॅन्सनी तिला सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला... पण तिचे कोणत्याच सोशल नेटवर्किंग साईटवर अकाऊंट नसल्याने त्यांची निराशा झाली.

श्याम रामसे यांनी एका मुलाखतीत जॅस्मिनविषयी एक वेगळीच गोष्ट सांगितली होती. २०१७ मध्ये त्यांनी सांगितले होते की, जॅस्मिन ही मुंबईतच असून तिच्या आईच्या निधनानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. वीराणा २ हा चित्रपट बनवण्याचा माझा विचार असून या चित्रपटात मी जॅस्मिनला नक्कीच घेईन. पण २०१९ मध्ये श्याम यांचे निधन झाले.

टॅग्स :बॉलिवूड