Join us  

TikTok स्टार फैजल सिद्दीकीला अ‍ॅसिड हल्ल्याचा एक व्हिडीओ पडला भलताच महाग, महिला आयोगापर्यंत पोहोचले प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 4:14 PM

जाणून घ्या काय आहे प्रकरण, कोण आहे फैजल?

ठळक मुद्देफैजल सिद्दीकी हा लोकप्रिय टिकटॉकर आमिर सिद्दीकीचा भाऊ आहे.

टिक टॉक स्टार फैजल सिद्दीकी याला एक व्हिडीओ शेअर करणे चांगलेच महागात पडले. होय, फैजलने हा व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला. या व्हिडीओत फैजल मुलींवरच्या अ‍ॅसिड हल्ल्याचे उदात्तीकरण करताना दिसतोय.या व्हिडीओत तो एका मुलीवर पाणी (अ‍ॅसिड म्हणून) फेकतो. तू दुस-या मुलासाठी मला सोडले ना? असे तो मुलीला म्हणतो. यानंतर व्हिडीओतील मुलगी लाल मेकअपमध्ये दिसते. तिचा चेहरा अ‍ॅसिडने पोळलेला आहे हे दाखवण्यासाठी या लाल रंगाच्या मेकअपचा वापर केला आहे. फैजलने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो नेटक-यांच्या निशाण्यावर आला. भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे या व्हिडीओची तक्रार केली, तूर्तास हा व्हिडीओ टिकटॉकवरून हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर ट्विटरवर ‘#BanTiktok’ टॉप ट्रेंड करू लागला.

  

महिला आयोगाने घेतली गंभीर दखलया वादग्रस्त व्हिडीओची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणाचा पोलिस आणि टिकटॉक इंडियापर्यंत पाठपुरावा करू, असे आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. रेखा यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना पत्र लिहून फैजलविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर टिकटॉक इंडियाला पत्र लिहून फैजलजा टिकटॉकवर ब्लॉक करण्याची मागणी केली आहे.

कोण आहे फैजल सिद्दीकी

फैजल सिद्दीकी हा लोकप्रिय टिकटॉकर आमिर सिद्दीकीचा भाऊ आहे. अलीकडे आमिरने टिकटॉक युट्यूब पेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगत एक व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर युट्यूबर कॅरी मिनाटीने आमिरला रोस्ट केले होते. यावरून सोशल मीडियावर टिकटॉक विरूद्ध युट्यूब असे युद्ध रंगले होते. आमिर इतकाच त्याचा भाऊ फैजलही टिकटॉकवर लोकप्रिय आहे. त्याचे टिकटॉकवर 13.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

टॅग्स :टिक-टॉक