Join us  

... तर ‘बाहुबली’ वेबसिरीज अविस्मरणीय ठरेल -वकार शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 4:52 PM

अभिनेता वकार शेखने थेट बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. वकारने सरबजीत, ताजमहल, मिट्टी आदी हिंदी चित्रपटात काम केले आहे. शिवाय अनेक शॉर्टफिल्ममध्येही वकारने अभिनयाची चुणूक दाखविली आहे.

-रवींद्र मोरे  विविध मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने घराघरात पोहोचलेला अभिनेता वकार शेखने थेट बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. वकारने सरबजीत, ताजमहल, मिट्टी आदी हिंदी चित्रपटात काम केले आहे. शिवाय अनेक शॉर्टफिल्ममध्येही वकारने अभिनयाची चुणूक दाखविली आहे. विशेष म्हणजे याच अभिनयाच्या जोरावर वकार आगामी ‘बाहुबली : बिफोर द बिगिनिंग’ या वेबसिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासाबाबत वकारशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...

* नुकताच तुझी ‘हम’ ही शॉर्टफिल्म रिलीज झाली, यात हिंंदू-मुस्लिम हा संवेदनशील विषय हाताळण्यात आला आहे, नेमका हाच विषय का?- गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात खूपच गंभीर परिस्थिती बघावयास मिळत आहे. त्यानुसार असे वाटते की, देशात एकतेच्या भावनेची गरज आहे. ज्यापद्धतीने वेगवेगळ्या सुगंधाचे फुले एकाच माळेत रोवले गेले तर ती माळ सुगंधीत तर होतेच मात्र त्या माळेला वेगळे महत्त्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. जर एक झालो नाही तर विखुरले जाऊ. असे होऊ नये म्हणून हा विषय निवडण्याचे गरजेचे वाटले. या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच एक स्ट्रॉँग मॅसेजही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

* बाहुबलीच्या दोन्ही भागांच्या यशानंतर ‘बाहुबली : बिफोर द बिगीनिंग’ ही वेबसिरीज येतेय, यात तु महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे, शूटिंगचा अनुभव कसा वाटला?- बाहुबलीच्या दोन्ही भागांनी भारताबरोबरच संपूर्ण जगात यश मिळविले. हा चित्रपट एकप्रकारे बेंचमार्कच बनला आहे. आता या दोन्ही चित्रपटाचा अगोदरचा भाग अर्थात बिफोर द बिगीनिंग ही वेबसिरीज येत आहे. यात मी महत्त्वाची भूमिका साकारणार असून माझ्या भूमिकेविषयी मी खूपच एक्सायटेड आहे. विशेष म्हणजे दिग्गज दिग्दर्शक राजामौलींसोबत मला काम करण्याची जी संधी मिळाली त्याबाबत तर मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. त्यांच्यासोबत शूटिंग करताना जी मला शिकवण मिळत आहे याचा मला नक्कीच भविष्यात फायदा होणार आहे. शिवाय ज्या पद्धतीने ही शूटिंग होत आहे, ही वेबसिरीज नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.

* सध्या वेबसिरीजचा ट्रेंड जोरात सुरु आहे, याच्या भविष्याबाबत काय सांगाल?- गेल्या तीन-चार वर्षापुर्वी एका अ‍ॅक्टरसाठी टीव्ही आणि चित्रपट हाच पर्याय होता. मात्र सध्या वेबसिरीज हे क्षेत्र एवढे पॉप्युलर झाले आहे की, मोठ्यातला मोठा स्टारदेखील या वेबसिरीजकडे वळला आहे. जवळपास सर्वच तरुणाई आज वेबसिरीजला पसंत करताना दिसतेय. विशेष म्हणजे याने आमच्या सारख्या अ‍ॅक्टर्सनाही प्लेटफॉर्म मिळाला आहे आणि दिग्दर्शकांनाही कमाईचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

* टीव्ही आणि वेबसिरीजमध्ये काम करताना काय फरक जाणवतो?- एक अभिनेता म्हणून तर काही फरक जाणवत नाही. मात्र टीव्हीमध्ये काम करताना गती जास्त असते. अपेक्षित वेळ मिळत नाही,  मात्र वेबसिरीज मध्ये तसे नाही. यात काम करताना भरपूर वेळ मिळतो. वेळ मिळत असल्याने स्वत:वर काम करता येते. 

* नवोदित कलाकरांना काय सल्ला देशिल?- अगोदर स्वत:ला ओळखा, आपल्यात काय कौशल्य आहे तेही ओळखा. कारण या क्षेत्रात खूपच मोठी आणि कठोर स्पर्धा आहे. एका एका भूमिकेसाठी हजारो स्पर्धक आपल्या समोर उभे असतात. यासाठी स्वत:वर खूपच मेहनत घ्यावी लागेल. 

* तुझ्यासाठी अभिनय काय आहे?- खाण्या-पिण्यापेक्षाही माझ्यासाठी अभिनय महत्त्वपूर्ण आहे. मी १२-१३ वर्षाचा असताना या क्षेत्रात काम करत आहे. मी सुरुवातीपासून ठरविले होते की, मला अभिनय करायचा आहे. मी आतापर्यंत ५० ते ६० सिरियल्समध्ये काम केले आहे तर काही हिंदी चित्रपटही केले आहेत. शिवाय शॉर्टफिल्म्सही केले आहेत आणि आता वेबसिरीजकडे वळलो. मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करत राहणार आहे. 

टॅग्स :बाहुबली