Join us  

तान्हाजी - द अनसंग वॉरियरने आतापर्यंत केले इतके कलेक्शन, आकडा वाचून वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 1:44 PM

तान्हाजी - द अनसंग वॉरियर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत चांगलेच कलेक्शन केले आहे.

ठळक मुद्देतानाजीने गेल्या शुक्रवारी 10 ते 12 करोडची कमाई केली असून या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई 267.50 कोटी इतकी झाली आहे. 

अजय देवगणचा तान्हाजी - द अनसंग वॉरियर हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन महिने झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर तळ ठोकून आहे. काही राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री असल्याने तान्हाजीची कमाई अजूनही सुरू आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळतच आहे.

तान्हाजी - द अनसंग वॉरियर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले आहे. बॉक्स ऑफिस इंडिया या वेबसाईटनुसार, तानाजीने गेल्या शुक्रवारी 10 ते 12 करोडची कमाई केली असून या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई 267.50 कोटी इतकी झाली आहे. 

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ‘तान्हाजी’ रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. इतके की, दरदिवशी या सिनेमाने सरासरी 50 ते 60 लाखांची कमाई केली. या वर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर म्हणून ‘तान्हाजी’ने नवा विक्रम नोंदवला.

‘तान्हाजी’ पुढे गेल्या महिन्यांत रिलीज झालेल्या कुठल्याही सिनेमाचा टिकाव लागला नाही. छपाक, पंगा, जवानी जानेमन, मलंग, लव्ह आज कल असे अनेक चित्रपट आलेत आणि गेलेत. पण ‘तान्हाजी’ची जादू मात्र कायम राहिली. इतक्या दिवसांनंतरही या चित्रपटाची जादू ओसरलेली नाही. महाराष्ट्रात या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली. पाचव्या आठवड्यात ‘मलंग’ आणि ‘शिकारा’ या सिनेमासोबत ‘तान्हाजी’ची टक्कर झाली. मात्र या दोन्ही सिनेमांनी पहिल्याच आठवड्यात निराशा केली. त्यानंतर व्हॅलेन्टाईनच्या मुहूर्तावर रिलीज झालेला ‘लव्ह आज कल’ हा सिनेमाही कमाल दाखवू शकला नाही. साहजिकच ‘तान्हाजी’ची घोडदौड कायम राहिली. या आठवड्यात प्रदर्शित झालेला थप्पडदेखील या चित्रपटाचे कलेक्शन थांबवू शकला नाही. 

तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा चित्रपट अजय देवगणचा 100 वा चित्रपट आहे. अजयने यात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

टॅग्स :तानाजीअजय देवगण