Join us  

Swatantra Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:11 PM

Swatantra Veer Savarkar:आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट भेटीला येतो आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra Veer Vinayak Damodar Savarkar) यांची जयंती आहे. २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे त्यांचा जम्न झाला होता. सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते. ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना सामाजिक रुढी परंपरांविरोधात मोठे काम केले. आता त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट भेटीला येतो आहे. या चित्रपटाचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar). या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा वीर सावरकरांची भूमिका साकारत आहे. 

निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, तर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली आहे.

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाच्या स्क्रीप्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भूमिकेसाठी रणदीप हुडा खूप मेहनत घेत आहे, याची झलक चित्रपटाच्या फर्स्ट लूकमधून पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमिकेसाठी रणदीपला सामील करून घेण्यात आल्यामुळे अभिनेता अत्यंत आनंदी आहे.मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्याने या भूमिकेसाठी वजन कमी करण्यास सुरुवात केली आहे.

रणदीप हुडा आणि चित्रपट निर्माते यांनी यापूर्वी 'सरबजीत' चित्रपटात एकत्र काम केले आहे. ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. एका मुलाखतीत संदीप सिंग म्हणाले की, 'गेल्या २ वर्षांपासून आम्ही हा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहोत. त्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर मराठी आहेत आणि त्यांना वीर सावरकरांना पडद्यावर कसे सादर करायचे हे चांगलेच ठाऊक आहे.संदीप सिंग पुढे म्हणाले की, 'स्वतंत्र वीर सावरकर'च्या फर्स्ट लूकचा पोशाख अॅश्ले रिबेलोने तयार केला आहे. छायाचित्रण विकी इदयानी यांनी केले आहे तर रणदीप हुडाचा मेकअप रेणुका पिल्लईने केला आहे. रणदीप मराठी बोलीचे प्रशिक्षण घेत आहे. बाकी कलाकारांना अजून कास्ट करायचे आहे, काही कलाकारांना लंडनमधून घेतले जाणार आहे.

टॅग्स :रणदीप हुडामहेश मांजरेकर