सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput ) 14 जून 2020 रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी कथितरित्या गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. (Sushant Singh Rajput death anniversary) आज सुशांतच्या निधनाच्या एक वर्षानंतरही त्याचे चाहते, त्याचे कुटुंबीय व मित्र या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांतने अनेक स्वप्नं पाहिली होती, त्याच्या डोळ्यांतील ती असंख्य स्वप्नं, त्याच्या चेह-यावरचं निरागस हास्य कधीही कुणीच विसरू शकणार नाही.सुशांत चित्रपट अभिनेता होता. पण त्याच्यामनात ग्रह-ता-यांबद्दल अपार कुतूहल होते. तासन् तास तो आकाशातील ग्रह-ता-यांचे निरीक्षण करत बसायचा. सोबत काम करणा-या अनेकांना सुशांत या ग्रह-ता-यांबद्दल वेगवेगळी माहिती द्यायचा. त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर नजर टाकल्यास सुशांतबद्दलच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी दिसतील.
सुशांतच्या ट्विटर हँडलबद्दल सांगायचे तर त्याने एका पेंटिंगचा फोटो कव्हरपेजवर लावला होता. या पेंटिंगमागची कथा खूपच रोमांचक आहे. ही एक जगप्रसिद्ध पेंटिंग आहे. जगातील सर्वाधिक गाजलेल्या आर्ट पीसपैकी एक आहे. कॉफी मगपासून तर घरांच्या भींतींपर्यंत ही पेंटिंग तुम्हाला दिसेल. जगप्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गोघ (Vincent van Gogh - Starry Night) यांनी ते चितारले होते. या चित्राचे सौंदर्य अनंत आहे. कदाचित शब्दांत सांगता येणार नाही,असे. त्यामुळेच या चित्राचा अर्थ, त्याचा भावर्थ समजणे प्रत्येकाला शक्य नाही. कदाचित सुशांतसारखे दुस-या जगाची स्वप्नं बघणारी माणसंच या चित्राला उत्तमरित्या समजू शकतात. Starry Nights असे या पेटिंगचे नाव असून ते व्हिन्सेट व्हॅन गॉघ यांनी 1889 मध्ये चितारले होते. त्यावेळी गॉघ हे नैराश्यामुळे मनोरुग्णालयात होते. यानंतर 1890 साली व्हिन्सेट गॉघ यांनी आत्महत्या केली.