सुनिधी चौहान लवकरच बनणार आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 16:33 IST
सुनिधी चौहानचा आज ३४ वा वाढदिवस असून ती हा वाढदिवस खूप आनंदाने तिच्या पतीसोबत साजरा करत आहे आणि आज ...
सुनिधी चौहान लवकरच बनणार आई
सुनिधी चौहानचा आज ३४ वा वाढदिवस असून ती हा वाढदिवस खूप आनंदाने तिच्या पतीसोबत साजरा करत आहे आणि आज तिच्याकडे तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी एक खूप चांगले कारण देखील आहे. कारण सुनिधी लवकरच आई होणार आहे. सुनिधीने एप्रिल २०१२ मध्ये हितेश सोनिकशी लग्न केले होते. तिचे हे दुसरे लग्न असून वयाच्या अठराव्या वर्षी तिने दिग्दर्शक बॉबी खानसोबत लग्न केले होते. त्यावेळी बॉबी हा ३२ वर्षांचा होता. सुनिधीने इतक्या लहान वयात तिच्यापेक्षा दुप्पट वयाने असलेल्या व्यक्तिशी लग्न करणे तिच्या कुटुंबियांना पटले नव्हते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला सुनिधीच्या घरातल्यांचा प्रचंड विरोध होता. पण घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता तिने लग्न केले. मात्र केवळ वर्षाच्या आता तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला. २००३ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर सुनिधी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये अडकायला घाबरत होती. पण हितेश आणि तिची ओळख झाल्यावर त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले.सुनिधी आणि हितेशच्या घरात आता एक छोटासा पाहुणा येणार आहे. पिंकव्हिला या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार ती लवकरच आई होणार आहे. सुनिधी अतिशय लहानपणापासून गायनाचे शिक्षण घेत आहे. तिचे कुटुंब नवी दिल्लीत राहात होते. तिने वयाच्या चौथव्या वर्षांपासून स्टेजवर गायला सुरुवात केली होती. एका स्टेज शोच्या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री तब्बसूम यांनी तिचे गाणे ऐकले आणि तिच्या घरातल्यांनी सुनिधीला घेऊन मुंबईला यावे असा सल्ला दिला आणि मुंबईत आल्यापासून सुनिधीचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला.