तेलगु हीरोच्या अकलेचे तारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 06:50 IST
सिनेअभिनेत्यांनी एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे की, ते समाजाचे आदर्श असतात. तरुण मंडळी त्यांना फॉलो करत असते. त्यामुळे ...
तेलगु हीरोच्या अकलेचे तारे
सिनेअभिनेत्यांनी एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे की, ते समाजाचे आदर्श असतात. तरुण मंडळी त्यांना फॉलो करत असते. त्यामुळे जबाबदारीने वागायची नैतिकता त्यांच्यामध्ये असणे अपेक्षित असते.कोणी तरी ही समज तेलगु अभिनेता आणि राजकारणी एन. बालकृष्णाला जाऊन सांगायला हवी. ‘महिला दिना’निमित्त संपूर्ण जगात महिला सबलीकरण, त्यांचे समर्पण, त्यांच्या सन्मानाची सगळीकडे चर्चा होत असताना या महाशयांनी महिलांप्रति अतिशय लाजरवाणे अपशब्द वापरले आहेत.एका कार्यक्रमामध्ये बालकृष्ण म्हणाला की, मी नेहमी वेगवेगळे रोल स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. एकाच प्रकारचे सिनेमे केले तर माझे चाहते नाराज होतील. मी जेव्हा मुलींना किस करतो किंवा त्यांना गर्भवती बनवतो तेव्हा माझे चाहते खूश होतात’एवढेच नाही तर पुढे फुशारक्या मारताना तो म्हणाला की, हीरोईन्ससोबत मी खट्याळपणे वागतो आणि कधीकधी त्यांना चिमटेदेखील काढतो. रवीकुमार नावाच्या व्यक्तीने सरुरनगर पोलिस ठाण्यात बालकृष्णच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारचे अभद्र शब्द महिलांवरील अत्याचाराला चिथावणी देणारे आहेत.सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यावर या नेता-अभिनेत्याने माफी मागितली. तो म्हणतो, महिलांना उद्देशून किंवा त्यांचा अनादर करण्याच्या हेतूने मी असे बोललो नव्हतो. मी करत असलेल्या भूमिकांच्या संदर्भात मी तसे बोललो. देशातील तमाम स्त्रीयांना ‘महिला दिना’निमित्त अभिवादन करून त्यांची माफी मागतो.