Join us  

श्रीलंका बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावली 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 12:59 PM

श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या बॉम्बस्फोटात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात भारतीय अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे.

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात आतापर्यंत १२५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि चारशेहून अधिक लोक जखमी झाले आहे. या मृतांमध्ये पाच भारतीयांचा समावेश आहे. मात्र या बॉम्बस्फोटातून दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका शरतकुमार थोडक्यात बचावल्या आहेत. त्या कोलंबोमधील सिनामोन हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या व याच हॉटेलमध्ये एक बॉम्बस्फोट झाला. ही माहिती खुद्द त्यांनी ट्विटरवर दिली आहे.राधिका शरतकुमार यांनी ट्विट केले की, 'अरे देवा श्रीलंकेत बॉम्बस्फोट, देवा सर्वांची मदत कर. बॉम्बस्फोट होण्याच्या काही वेळापूर्वीच मी कोलंबोतील सिनामोन ग्रँड हॉटेलमधून चेक आऊट केले होते. मला अजूनही विश्वास बसत नाही. हे खूपच धक्कादायक आहे'.

राधिका यांनी तीनशेहून जास्त तमीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटात काम केले आहे. त्यासोबतच त्यांनी दक्षिणात्य मालिकांमध्येदेखील काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी चिट्टी, अन्नामलाई, सेलवी, थमाराई, अरासी, चेल्लमे, वानी रानी यासारख्या मालिकांची निर्मिती केली आहे. तर हिम्मतवाला, आज का अर्जुन, लाल बादशाह, हम तुम्हारे, असली नकली या चित्रपटात काम केले आहे. १९९० साली प्रदर्शित झालेल्या आज का अर्जुन चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेयर बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून नामांकित करण्यात आले होते.

टॅग्स :श्रीलंका