Join us  

Venu Madhav Death: साऊथचे सुपरस्टार कॉमेडियन वेणू माधव यांचे निधन, 39 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 2:41 PM

प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या ३९व्या वर्षी निधन झाले.

ठळक मुद्दे150 पेक्षा अधिक तेलगू व तामिळ चित्रपटांत त्यांनी काम केले.

साऊथ चित्रपटाचे सुपरस्टार कॉमेडियन आणि अभिनेते वेणू माधव यांचे आज निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. आज दुपारी 12.20 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते लिव्हर व किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. वेणू माधव यांचे जवळचे मित्र वामसी काका यांनी ट्वीट करून त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली. वेणू माधव यांच्या अकस्मात निधनाने टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने वेणू यांना सिकंदराबादच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. गत 22 सप्टेंबरला डॉक्टरांनी त्यांना रूग्णालयातून सुट्टी दिली होती.  लवकरात लवकर किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन दिवसांतच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली.  काल 24 सप्टेंबरला  त्यांना पुन्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.वेणू यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नालागोंडा जिल्ह्याच्या कोडड गावात झाला होता. 1997 मध्ये ‘संप्रदायम’ आणि ‘मास्टर’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यानंतर अनेक चित्रपटांत ते दिसले. हंगामा, भूकैलास, प्रेमाभिशेकम यात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. 150 पेक्षा अधिक तेलगू व तामिळ चित्रपटांत त्यांनी काम केले.  Dr.Paramanandaiah Students या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते. गेल्या दोन वर्षांत त्यांनी राजकारणातही सहभाग घेतला. ‘तेलुगू देसम पार्टी’साठी त्यांनी प्रचार केला होता.