Join us

आपल्या गुरूंसाठी सोनू निगम ने केले एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 16:34 IST

पद्मश्री, पद्मभूषण आणि आता या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा ८७ वा वाढदिवसा निमित्त ...

पद्मश्री, पद्मभूषण आणि आता या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा ८७ वा वाढदिवसा निमित्त त्यांचे शिष्य सोनू निगम यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वतः गुलाम मुस्तफा खान, मुर्तुझा, क़ादिर, रब्बानी, हसन हे त्यांचे चार चिरंजीव, नातवंड, सर्व कुटुंबीय आणि शिष्यवर्गही ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सोनू निगम म्हणाले, "गुरुजी माझ्या वडीलासमान आहेत आणि ह्यावर्षी त्यांना पद्मविभूषण मिळाले आहे म्हणून आम्ही सगळे त्यांचा ८७ वा जन्मदिवस आणि पद्मविभूषण सम्मान साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत."गुलाम मुस्तफा खान यांनी भारताच्या संगीत परंपरेला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून दिले आणि त्याचबरोबर अनेक शिष्यांना घडवून गायन वादनाची ही कला अविरतपणे चालू राहील याकडेही तेवढ्याच जाणीवेने लक्ष दिलेले आहे, त्यामुळेच त्यांना अभिमान वाटावा, असे संगीतकार्य सोनू निगम, ए. आर. रहमान, हरिहरन, शान ह्यासारख्या त्यांच्या अशा अनेक शिष्यांकडून झाले आहे.सोनू निगम, हरिहरन, शान, रूपकुमार राठोड ह्या शिष्यांबरोबर सचिन पिळगावकर, जावेद अख्तर, अनुप जलोटा, अभिजीत भट्टाचार्य, ललित पंडित, समीर सेन, मधुश्री, मित ब्रदर्स, सलीम मर्चंट, कविता कृष्णमुर्ती, सुरेश वाडकर, शंकर महादेवन,अलका याज्ञिक, अरमान मलिक, हृषिकेश चुरी,प्रिया सरैया, राजनीतिज्ञ संजय निरुपम, त्यांची स्वतःची  मुले, नातवंडे  ह्या सर्वांनी गुलाम मुस्तफा खान ह्यांच्याबरोबर व्यतित केलेल्या काही आठवणी सांगून गाणी गायली, त्यामुळे एक अनोखी संगीत मैफिल प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. ह्या कार्यक्रमात उस्तादजींच्या आत्मकथेचे कव्हर सुद्धा लॉंच केले गेले. उपस्थितानी त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देताना, पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्धल अभिनंदनही केले.