Join us

म्हणून मराठी सिनेमात काम करणार नाही आमिर खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:05 IST

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खाननं आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध हिंदी सिनेमात आमिरनं साकारलेल्या विविधरंगी भूमिका रसिकांच्या मनात ...

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खाननं आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध हिंदी सिनेमात आमिरनं साकारलेल्या विविधरंगी भूमिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. मध्यंतरीच्या काळात आमिर खान मराठीचे धडे गिरवत होता. त्यामुळे आमिर लवकरच मराठी सिनेमात काम करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आमिरच्या फॅन्ससाठी एक बातमी आहे, ती म्हणजे आमिर खान एवढ्यात मराठी सिनेमा करणार नाही. मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा खूप आहे. मात्र आपलं मराठी इतकं काही चांगलं नसल्याची कबुली खुद्द आमिर खाननं दिली आहे. मराठीमधून संवाद साधण्याचा आपण कायम प्रयत्न करत असतो.माझ्या मराठी बोलण्याला मी 200 गुण देईल. मात्र हा गंमतीचा भाग असला तरी आपलं मराठी काही इतकं छान नाही अशी प्रांजळ कबुली खुद्द आमिर खाननं दिली आहे.मी चांगला विद्यार्थी नाही असंही आमिरनं म्हटलं आहे. जे काही मराठी बोलतो याचं सारं श्रेय आमिरनं त्याच्या गुरुंना दिलं आहे. कॅमे-यासमोर मराठीत कुणी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांना मराठी भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यावेळी पटकन काही शब्द आठवत नाही. त्यामुळे अडखळ अडखळत मराठी बोलत बोलण्याचा ट्रॅक आपोआप हिंदीवर शिफ्ट होत असल्याचं मिस्टर परर्फेक्शनिस्टनं सांगितलं.भाषांमध्ये आपण थोडे कच्चे असून परफेक्ट मराठी बोलण्यासाठी आणखी किमान 3-4 किंवा 5 वर्ष तरी लागतील असं आमिरनं सांगितले. जेव्हा उत्तम मराठी बोलेन त्याचवेळी मराठी सिनेमात काम करेन अशी ग्वाहीसुद्धा आमिर खाननं दिली आहे. मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान जे काही करतो ते पर्फेक्ट असतं. मग ते एखादा सिनेमा असो किंवा त्या सिनेमातील भूमिका. त्या भूमिकेतलं परफेक्शन असो किंवा ते परफेक्शन येण्यासाठी करावी लागणारी मेहनत, प्रत्येक गोष्टीत आमिर तितकाच जीव ओतून काम करतो. 'पीके' सिनेमातील लूकसाठी कमी केलेलं वजन असो किंवा मग 'दंगल' सिनेमातील महावीर फोगाट साकारण्यासाठी वाढवलेलं वजन असो. प्रत्येक वेळी आमिरनं विशेष मेहनत घेत आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. त्याची ही मेहनत सिनेमातील भूमिकांमध्येच दिसते असं नाही. त्याची ही मेहनत मराठीचे धडे घेण्यात आणि मराठी शिकण्यातही दिसते आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.