Join us  

'गेल्या ३ तासांपासून माझी मुलगी दुधाची वाट बघतेय…', गायक अंकित तिवारी संतापला ५ स्टार हॉटेलवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 2:27 PM

Ankit Tiwari: बॉलिवूड गायक अंकित तिवारीला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खूप वाईट अनुभव आला. याचा त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलिवूड गायक अंकित तिवारी(Singer Ankit Tiwari)ने दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. 'गलियां' आणि 'सुन रहा है ना तू' फेम गायकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की तो दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील रॉयल प्लाझा हॉटेलमध्ये थांबला होता. मात्र रात्री दीड वाजेपर्यंत खाण्याची किंवा पाण्याची व्यवस्था नव्हती. 

अंकित तिवारीने दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधील व्हिडिओ शेअर करत त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,  'हॉटेल रॉय प्लाझा, नवी दिल्ली. मला कुटुंबासह बंधक करून ठेवल्यासारखे वाटले . खूप वाईट अनुभव. पंचतारांकित हॉटेलमध्ये पाणी नाही, जेवण मागवून ४ तास झाले… बाहेरून जेवण आणायला परवानगी नाही. त्यामुळे दुसरा पर्याय नाही. काहीही बोलाल तर कर्मचारी बाऊन्सरची धमकी देत आहेत.

अंकितने पोस्ट केलेला व्हिडिओ १ मिनिट २९ सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ हॉटेलच्या लॉबीमध्ये शूट करण्यात आला आहे. अंकितसोबत इतर लोकही तिथे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अंकित म्हणतोय की, काल रात्रीपासून तो इतका अस्वस्थ आहे की त्याला पहाटे ५ वाजता झोप लागली. अंकितने सांगितले की, तो कुटुंबासह हरिद्वारला गेला होता. तिथून दिल्लीत एक रात्र मुक्काम करून मग वृंदावनला जायचा प्लान होता. तो आपली मुलगी आणि पत्नीसह रॉयल प्लाझा येथे थांबला होता.

अंकितने सांगितले, हॉटेलवाल्यांनी बाउन्सर्स बोलवलेत्याच्या समस्यांचा संदर्भ देत अंकित म्हणाला, 'इथे चेक-इन करायला ४५ मिनिटे लागली. त्यानंतर आम्ही आमच्या खोलीत गेलो. तिथून जेवण मागवले. चार तास झाले, पण अन्न नाही पाणी आले नाही. माझी मुलगी तीन वर्षांची आहे. तिच्यासाठी दूध मागवले होते, पण आजतागायत ते आलेले नाही. रूम सर्व्हिसचा फोन कोणी उचलत नाही. मी खाली आल्यावर कर्मचारी वाईट बोलले. ते आम्हाला शिवीगाळ करून बोटे दाखवत होते. त्यांनी सुरक्षा आणि बाउन्सर्सना बोलवले. 

या लोकांना लाज वाटली पाहिजे - अंकित

अंकित तिवारीने हॉटेलवाल्यांना सांगितले की, तो जात आहे, फक्त त्याचे पैसे परत करा. मात्र यावरही हॉटेल व्यवस्थापनाने ऐकले नाही. ड्युटी मॅनेजर फक्त मास्क घालून हसत होता. अंकित म्हणतो एवढ्या रात्री मी पत्नी आणि मुलासोबत कुठे जाणार आहे. व्हिडिओच्या शेवटी अंकित तिवारी म्हणाला, 'मी आजपर्यंत असे कोणतेही ट्विट केलेले नाही. पण त्यांचा बेजबाबदारपणा इतका वाढला आहे की हा व्हिडिओ पोस्ट करणे आवश्यक आहे. जर हे लोक आम्हा कलाकारांसोबत हे करू शकत असतील तर सामान्य लोकांसोबत कसे वागत असतील? लाज वाटली पाहिजे या लोकांना अशा निकृष्ट सेवेची.

टॅग्स :अंकित तिवारी