Join us  

अनिल कपूरच्या फन्ने खान आणि वो सात दिन या चित्रपटाच्या व्यक्तिरेखांमध्ये आहे हे साम्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:55 PM

फन्ने खान या चित्रपटात आणि अनिल कपूरच्या वो सात दिन या चित्रपटात एक साम्य आहे. अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दिच्या सुरुवातीला वो सात दिन या चित्रपटात काम केले होते.

अनिल कपूरच्या फन्ने खान या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अनिल कपूर त्याची मुलगी सोनम कपूरसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. या चित्रपटात आणि अनिल कपूरच्या वो सात दिन या चित्रपटात एक साम्य आहे. अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दिच्या सुरुवातीला वो सात दिन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत पद्मिनी कोल्हापूरे आणि नसिरुद्दीन शहा यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. अनिल कपूर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी वो सात दिन हा चित्रपट मानला जातो. वो सात दिन या चित्रपटात अनिल कपूरने संगीत क्षेत्रात करियर करण्यासाठी शहरात आलेल्या एका मुलाची व्यक्तिरेखा साकारली होती. अशाच प्रकारची काहीशी व्यक्तिरेखा फन्ने खान या चित्रपटात अनिल कपूरची आहे. अनिल कपूर या चित्रपटात एका टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारत असून गायक बनण्याची त्याची तरुणपणापासूनची इच्छा असते. पण त्याला गायक बनण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आपले हे स्वप्न आपल्या मुलीने पूर्ण करावे असे त्याला नेहमी वाटत असते. मुलीला स्टार बनवण्यासाठी धडपड करणाऱ्या बापाची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. वो सात दिन या चित्रपटानंतर जवळजवळ 35 वर्षांनंतर अनिल कपूर संगीत क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. फन्ने खान या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट ही चांगलीच तगडी आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय देखील मुख्य भूमिकेत आहे. जवळजवळ 17 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अनिल कपूर एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत असून तिच्या प्रियकराच्या भूमिकेत राजकुमार राव दिसणार आहे. हा चित्रपट 3 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

टॅग्स :अनिल कपूरऐश्वर्या राय बच्चनराजकुमार राव