Join us  

अभिनयासोबतच या क्षेत्रात सिद्धार्थ मल्होत्राला आजमवायचे त्याचे नशीब

By प्राजक्ता चिटणीस | Published: November 13, 2019 6:00 AM

सिद्धार्थला अभिनयासोबतच आणखी एक गोष्ट करायची असल्याचे त्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

ठळक मुद्देमी एक साहाय्यक दिग्दर्शक म्हणून माझ्या करियरला सुरुवात केली असली तरी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा माझा काहीही विचार नाहीये. केवळ भविष्यात मला चित्रपटाची निर्मिती करायची आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. तो मरजावाँ या त्याच्या आगामी चित्रपटात एका अँग्री मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

मरजावाँ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर रघू ने झोया को क्यों मारा हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला होता. या ट्रेंडविषयी तू काय सांगशील?

ऐंशीच्या दशकातील नायकांप्रमाणे मरजावाँ या चित्रपटातील हा नायक आहे. आजकाल अशाप्रकारचे चित्रपट पाहायला मिळत नाहीत. नायिकेसाठी लढणारा, तिच्यासाठी काहीही करण्यास तयार असलेल्या नायकाची भूमिका या चित्रपटात मी साकारणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नायक नायिकेला गोळी मारताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर रघू ने झोया को क्यों मारा याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे. हा चित्रपट अतिशय गंभीर असला तरी या चित्रपटाचे चित्रीकरण करताना आम्ही सगळ्यांनी खूप मजा मस्ती केली आहे. जानेवारीत मुंबईच्या बाहेर आम्ही चित्रीकरण करत होते. त्यावेळेचा एक किस्सा मी येथे आवर्जून सांगेन. त्यावेळी खूप पाऊस होता. आम्ही सगळे भिजतच चित्रीकरण करत होतो. पण आमचे दिग्दर्शक मिलाप झवेरी पावसात भिजू नये यासाठी दूर जाऊन बसायचे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक दिवस त्यांना भिजवायचे ठरवले. त्यांना केवळ आम्ही भिजवलेच नाही तर त्यांच्या कपड्यावर आम्ही चिखल देखील फेकला.  

या चित्रपटाद्वारे तुझी चॉकलेट हिरोची इमेज बदलेल असे तुला वाटते का?ब्रदर, एक व्हिलन यांसारख्या काही चित्रपटांमध्ये मी ॲक्शन करताना दिसलो आहे. पण या चित्रपटातील माझी भूमिका आजवरच्या सगळ्याच चित्रपटांपेक्षा खूप वेगळी आहे. या चित्रपटात मी अभिनयासोबतच माझा लूक, बॉडी यावर प्रचंड मेहनत घेतली आहे. रघूची भूमिका लार्जर दॅन लाइफ असल्यामुळे या चित्रपटात मी शरीराला आग लावताना, हाणामारी करताना, हॅल्मेट तोडताना दिसणार आहे. हे सगळे माझ्यासाठी खूपच नवीन होते. पण हे सगळे मी एन्जॉय केले. या चित्रपटाची प्रेमकथा खूप वेगळी असून ही प्रेमकथा प्रेक्षकांना भावेल याची मला खात्री आहे. या चित्रपटातील भूमिकेमुळे माझी इमेज बदलली तर मला ही गोष्ट नक्कीच आवडेल.  

सोशल मीडियावर सध्या प्रत्येक गोष्टीवर सेलिब्रेटींना ट्रोल केले जाते. याविषयी तुला काय वाटते?सोशल मीडिया हे जग खरे नाहीये. अनेकवेळा तर लोक खोट्या नावाने, खोटी माहिती देऊन अकाऊंट ओपन करतात. त्यामुळे या ट्रोलिंगकडे मी कधीच लक्ष देत नाही. केवळ सोशल मीडियामुळे मला माझ्या फॅन्ससोबत बोलता येते. त्यांच्या माझ्या चित्रपटाविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेता येतात. ही सोशल मीडियावरची सगळ्यात चांगली गोष्ट असल्याचे मला वाटते. 

तू अभिनयक्षेत्रात येण्याआधी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहेस, भविष्यात चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार आहे का?मी एक साहाय्यक दिग्दर्शक म्हणून माझ्या करियरला सुरुवात केली असली तरी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा माझा काहीही विचार नाहीये. केवळ भविष्यात मला चित्रपटाची निर्मिती करायची आहे. मी दिग्दर्शक नव्हे तर निर्माता बनवण्याचा विचार केला आहे.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रामरजावां