Join us  

‘सैराट’च्या हिंदी रिमेकची याठिकाणी होणार शूटिंग; आर्चीच्या भूमिकेत दिसेल श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 3:29 PM

शंभर कोटी रुपयांची कमाई करणाºया मराठी सैराटच्या हिंदी रिमेकवर सध्या जोरदार काम सुरू असून, चित्रपटाचे शूटिंग लोकेशन निश्चित करण्यात ...

शंभर कोटी रुपयांची कमाई करणाºया मराठी सैराटच्या हिंदी रिमेकवर सध्या जोरदार काम सुरू असून, चित्रपटाचे शूटिंग लोकेशन निश्चित करण्यात आले आहे. या चित्रपटातून अभिनेत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, चित्रपटाची शूटिंग राजस्थानमधील उदयपूर येथे केली जाणार आहे. शूटिंगचे लोकेशन बघण्यासाठी काही दिवसांपूर्वीच जान्हवी उदयपूरला पोहोचली होती. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत निर्मित या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. होय, चित्रपटाच्या शूटिंगला १८ नोव्हेंबरपासून उदयपूर येथे सुरुवात केली जाणार आहे. हा चित्रपट मराठी सैराटचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशांत खट्टर प्रमुख भूमिकांमध्ये बघावयास मिळणार आहेत. दोघांचाही हा डेब्यू चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये आतापासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. या दोन्ही कलाकारांनी नुकताच उदयपूरला फेरफटका मारत शूटिंगचे लोकेशन बघितले. शूटिंगसाठी येणारे संपूर्ण क्रू हॉटेल रेडिसन ब्लू येथे थांबणार आहेत. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या मराठी सैराटने कमाईचे बहुतांश रेकॉर्ड आपल्या नावे केले. कारण शंभर कोटी रुपयांची कमाई करणारा सैराट एकमेव चित्रपट ठरला आहे. दरम्यान, हिंदीत बनणाºया सैराटच्या रिमेकला शशांक खेतान दिग्दर्शित करणार आहेत. चित्रपटात ईशांत एका दलित मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर जान्हवी उच्चवर्णीय म्हणजेच ब्राह्मण समाजातील मुलीच्या भूमिकेत असेल. दोघांमध्ये प्रेम दाखविण्यात येणार असून, पुढे सैराटप्रमाणेच त्याचा क्लायमॅक्स असेल. समाजातील जातीय बंधने दाखविण्यासाठी उदयपूरमधील ग्रामीण भागाची निवड करण्यात आली आहे. ईशांत आणि जान्हवीच्या प्रेमकथेतील काही भाग आणि काही गाणे उदयपूरमध्येच शूट केले जाणार आहेत.  रेडसिन ब्लूच्या स्वाती अग्रवालने सांगितले की, हॉटेलसाठी चित्रपटाच्या संपूर्ण क्रूची बुकिंग १८ नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. त्यामुळे याच दिवसापासून शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.