Shocking : आयशा टाकिया या हिंदू मुलीशी विवाह केल्याने अबू आझमींच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 18:06 IST
हॉटेल व्यावसायिक आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांना फोनवर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली ...
Shocking : आयशा टाकिया या हिंदू मुलीशी विवाह केल्याने अबू आझमींच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी!
हॉटेल व्यावसायिक आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांना फोनवर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन करणाºयाने फरहान यांना धमकी देताना म्हटले की, ‘एका हिंदू मुलीशी लग्न केल्यामुळेच तुला आम्ही जिवे मारणार आहोत’. दरम्यान, फरहानने याबाबतची तक्रार दिली असून, पोलीस याबाबतचा तपास करीत आहेत. फरहानने बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया हिच्याशी २००९ मध्ये विवाह केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत फरहानने म्हटले की, फोन करणाºयाने म्हटले की, तो हिंदू सेनेशी संबंधित आहे. तुझी फॅमिली सेनेच्या निशाण्यावर असून, तुला आम्ही जिवे मारणार आहोत. पुढे तक्रारीत फरहानने म्हटले की, ‘तू एका हिंदू मुलीशी विवाह केला आहे, त्यामुळेच तुला ही शिक्षा दिली जाणार आहे. फरहानने आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगताना याप्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. यावेळी फरहानने पोलिसांना फोन कॉल रेकॉर्ड दिले आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फोन रेकॉर्डच्या मदतीने सखोल तपास करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, फरहान अबू आझमी एक हॉटेल व्यावसायिक असून, मुंबई स्थित आहे. त्यांनी २००९ मध्ये अभिनेत्री आयशा टाकिया हिच्याशी लग्न केले होते. लग्नाअगोदर दोघांमध्ये बरेच वर्ष अफेयर होते. फरहान मुस्लीम परिवारातील असून, आयशाचे वडील हिंदू आहेत, तर तिची आई एंग्लो इंडियन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लग्नानंतर आयशाने इस्लामचा स्वीकार केला आहे. मात्र याबाबत आयशाकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आयशा आणि फरहानला चार वर्षांचा मुलगा असून, त्याचे नाव मिकाइल आहे. दरम्यान, फरहान गेल्या कित्येक वर्षांपासून वडिलांप्रमाणेच रेस्टॉरंट व्यवसायात आहेत. या व्यवसायातून त्यांनी केवळ चारच वर्षांत दुप्पट संपत्ती मिळविली आहे. २०१० मध्ये जेव्हा ते भिवंडीमधून समाजवादी पक्षाकडून पोटनिवडणुकीसाठी उभे होते तेव्हा त्यांची संपत्ती १६ कोटी रुपये एवढी होती. पुढे २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई येथून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती ६४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. गेल्या महिन्यातच फरहान यांनी मोठ्या धुमधडाक्यात वर्सोवा येथे ‘कोयला’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते. यामध्ये कासिफ खान त्यांचे पार्टनर होते. मात्र ज्या जागेवर हे रेस्टॉरंट सुरू केले होते, ती जागा अभिनेता सोनू सूद याच्या मालकीची होती. सोनू सूदने जागा रिकामी करण्याचे सांगितले होते. कारण सोनूला या जागेचे भाडे दिले जात नव्हते. त्याचबरोबर जे चेक दिले होते तेदेखील बाउंस झाले होते. अखेर कोयला रेस्टॉरंट बंद करावे लागले. हे रेस्टॉरंट बंद झाल्याने आझमी खूपच दु:खी झाले होते. वास्तविक सोनू सूद आणि फरहान आझमी यांच्यात खूपच चांगली मैत्री आहे. मात्र फरहान यांच्या पार्टनरमुळेच हे रेस्टॉरंट बंद करावे लागले. कारण फरहान यांच्या पार्टनरने रेस्टॉरंट स्टाफ यांना पगार दिला नव्हता. शिवाय वीज बिलही भरले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. यावेळी फरहान यांनी पार्टनर खानवर आरोपही केले होते. फरहानने म्हटले होते की, जेव्हा मला ही बाब कळाली तेव्हा मी खूप नाराज झालो होते. परंतु खान यांनी गुंड पाठवून मला धमकाविले. तसेच रेस्टॉरंटमध्ये सर्व पैसेही लुटले. परंतु खान यांनी फरहानचे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, आता हे फोन कॉल प्रकरण समोर आल्याने, आझमी परिवार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून, सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणाची सूत्रे स्वीकारल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी अधिक सांगण्यास नकार दिला असला तरी, पोलिसांना बरेचसे धागेदोरे मिळाले असल्याचे समजते.