Join us  

सपना चौधरीने जानेवारीत केले सीक्रेट वेडिंग, ऑक्टोबरमध्ये दिला बाळाला जन्म

By रूपाली मुधोळकर | Published: October 07, 2020 10:26 AM

कोण आहे, जाणून घ्या सपनाचा पती?

ठळक मुद्दे वीर साहू हा एक हरियाणवी सिंगर आहे. शिवाय एक अ‍ॅक्टरही आहे.

हरियाणाची स्टार डान्सर आणि ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक सपना चौधरी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सपना आई बनली आहे. 4 ऑक्टोबरला सपनाने एका गोंडस बाळाला जन्म झाला. सपनाने गेल्या जानेवारीतच बॉयफ्रेन्ड वीर साहूसोबत लग्न केल्याचीही बातमी आहे. सपनाने बाळाला जन्म दिल्याची बातमी तूर्तास वणव्यासारखी पसरलीये. पण सपनाने मात्र अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सपनाच्या पतीने मात्र फेसबुक लाईव्हदरम्यान ही गोड बातमी शेअर केली.

सपना सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. मात्र असे असताना तिने अद्याप तिच्या लग्नाबद्दल वा बाळाबद्दल कुठलीही माहिती न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जातेय. मार्च महिन्यांत सपनाने गुपचूप साखरपुडा उरकला होता. सपना वीर साहूच्या प्रेमात असल्याची बातमी त्यावेळी पहिल्यांदा समोर समोर आली होती.दरम्यान सपना याबद्दल काहीही बोलली नसली तरी वीर साहूने फेसबुक लाईव्हवर ही गोड बातमी दिली. त्याने सपनाचे नाव घेतले नाही. मात्र लग्नाची बातमी कन्फर्म केली.  जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने लग्नाचा कुठलाही सोहळा आम्ही केला नाही, असे त्याने सांगितले. मात्र हीच गोष्ट सपनाच्या तोंडून ऐकण्यास चाहते उतावीळ आहेत. 

 कोण आहे वीर साहू? वीर साहू हा एक हरियाणवी सिंगर आहे. शिवाय एक अ‍ॅक्टरही आहे. हरियाणात तो प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये तो गातांना व अभिनय करताना दिसला आहे. सिंगींग व अ‍ॅक्टिंगसाठी त्याने त्याची एमबीबीएसचे शिक्षण सोडले होते. त्याचे पहिले गाणे ‘थाड्डी बड्डी’ तुफान गाजले होते. पंजाबी सिनेमा ‘गांधी फिर आ गए’मध्ये त्याने काम केले होते.

सपना अनेकदा वीरबद्दल बोलली आहे. ‘वीर स्वच्छ मनाचा माणूस आहे. 2015-16 मध्ये एका अवार्ड शोमध्ये आमची पहिली भेट झाली होती. पहिल्यांदा त्याला पाहिल्यावर तो प्रचंड गर्विष्ठ असल्याचे मला वाटले होते. यानंतर आम्ही पुन्हा एका अवार्ड शोमध्ये भेटलो. पण गर्दी जास्त असल्याने आम्ही एकमेकांशी बोलू शकलो नव्हतो. तिस-या भेटीत आम्ही एकमेकांशी बोललो,’असे सपनाने सांगितले होते.या भेटीनंतर सपना व वीर यांच्यात सतत बोलणे सुरू झाले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

  

खूप लहान वयात सपनाने स्टेजला आपलेसे केले. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रीय आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते.  सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कायम पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते. 

Hotness: ‘बिग बॉस11’च्या सहा-आठ महिन्यांत पुरती बदलली सपना चौधरी!

टॅग्स :सपना चौधरी