Join us  

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 2:28 PM

गुजरातच्या कच्छमधून दोन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी केली अटक

Salman Khan house firing case update: बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर मुंबई पोलीस हल्लेखोरांचा तपास करत होते. या दोन्ही आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली. गुजरातमधील भुज येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी दोघांची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही २५ एप्रिलपर्यंत म्हणजेच १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कामगिरी केली. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त लखमी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांच्या पथकाने गुजरातच्या कच्छमधून विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक केली. त्यांना मुंबईत आणून कोर्टात हजर केले. सागर पाल हा बाईक चालवत होता तर विकी गुप्ताने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. हे दोघेही दोन वर्षांपासून बिश्नोई गँगसाठी काम करत होते.

मंगळवारी सकाळी दोन्ही आरोपींना घेऊन मुंबई गुन्हे शाखा गुजरातमधून निघाली. आता या दोघांची मुंबईत चौकशी केली होणार आहे. अभिनेता सलमानच्या घराबाहेर रविवारी पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित लोकांची नावांची चर्चा सुरु होती. त्याच दरम्यान या दोघांना अटक केली. हल्लेखोरांनी पाच राऊंड गोळीबार केल्याची माहिती मिळाली होती.

टॅग्स :सलमान खानगोळीबारमुंबई पोलीस