Join us  

मैंने प्यार किया मधील या प्रसिद्ध सीनला सलमान खानने दिला ट्विस्ट, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 7:43 PM

या व्हिडिओत सलमान खानने मैंने प्यार किया या त्याच्या प्रसिद्ध चित्रपटातील एका सीनला मस्त ट्वि्स्ट दिला आहे.

ठळक मुद्देसलमानने या सीनला ट्वीस्ट दिला आहे. त्याने विनोदी ढंगात तो लिपस्टिकचा डाग आता सॅनिटायझरने पुसला आहे. त्यासोबत मैंने प्यार किया आता प्रदर्शित झाला असता तर... असे कॅप्शन दिले आहे.

अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. सध्या सलमान खान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत आहे. सलमान सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून तो त्याच्या फार्म हाऊसमधील विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 

सलमानने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामला शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कारण या व्हिडिओत सलमान खानने मैंने प्यार किया या त्याच्या प्रसिद्ध चित्रपटातील एका सीनला मस्त ट्वि्स्ट दिला आहे. मैंने प्यार किया या चित्रपटात प्रेम लव्ह लेटर वाचतो आणि सुमन आरशावर चुंबन देते असा एक सीन आहे. तिच्या लिपस्टिकचा डाग आरशावर आपल्याला त्या सीनमध्ये पाहायला मिळाला होता. त्यानंतर त्याच लिपस्टिकच्या डागावर प्रेम किस करतो असे चित्रपटात दाखवण्यात आले होते. पण आता सलमानने या सीनला ट्वीस्ट दिला आहे. त्याने विनोदी ढंगात तो लिपस्टिकचा डाग आता सॅनिटायझरने पुसला आहे. त्यासोबत मैंने प्यार किया आता प्रदर्शित झाला असता तर... असे कॅप्शन दिले आहे. 

सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ एका दिवसांत २२ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.  अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत सलमानचा हा अंदाज त्यांना आवडला असल्याचे सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर सलमानच्या याच व्हिडिओची चर्चा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

टॅग्स :सलमान खान