Join us  

रोहन मेहरा सांगतोय, स्टार किडलादेखील बॉलिवूडमध्ये करावा लागतो स्ट्रगल

By प्राजक्ता चिटणीस | Published: October 15, 2018 5:50 PM

रोहन मेहराने सिनेमेटोग्राफर म्हणून काम केले आहे. तसेच एका शॉर्टफिल्मचे देखील त्याने दिग्दर्शन केले आहे. आता तो अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे.

दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरा लवकरच बाजार या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान, चित्रांगदा सिंग, राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. रोहनने सिनेमेटोग्राफर म्हणून काम केले आहे. तसेच एका शॉर्टफिल्मचे देखील त्याने दिग्दर्शन केले आहे. अभिनय क्षेत्रातील पदार्पणाविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

कॅमेऱ्याच्या मागे तू गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेस, आता कॅमेऱ्याच्या समोर यायचा विचार कसा केलास?खरं सांगू तर मी बॉलिवूडमध्ये करियर करेन असे मला कधी वाटले देखील नव्हते. लहानपणापासून मला बँकिंग इंडस्ट्रीमध्ये करियर करायचे होते. त्यासाठी माझे प्रयत्न देखील सुरू होते. पण मला चित्रपट पाहाण्याची, संगीताची, गोष्टी सांगण्याची लहानपणापासून आवड होती. त्यामुळे या क्षेत्रात करियर करू शकतो असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला आणि मी या क्षेत्राकडे वळलो.

बाजार या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?अभिनयक्षेत्रात करियर करायचे हे ठरवल्यानंतर मी अनेक ऑडिशन्स देत होतो. त्याचदरम्यान मी बाजार या चित्रपटासाठी देखील ऑडिशन दिले. पण ऑडिशननंतर मला काहीही उत्तर मिळालेले नव्हते. बाजारमध्ये हा कलाकार झळकणार, तो कलाकार मुख्य भूमिकेत असणार अशा बातम्या वर्तमानपत्रात सतत येत होत्या. त्या वाचून मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळतेय की नाही याचे मला टेन्शन आले होते. मला प्रोडक्शन हाऊसकडून या चित्रपटाबाबत कळवण्यात आल्यानंतर मी प्रचंड खूश झालो होतो. 

स्टार किडला बॉलिवूडमध्ये संधी मिळणे सोपे असते असे म्हटले जाते हे खरे आहे का?तुम्ही स्टार किड असल्याने तुम्हाला चित्रपटात काम करण्याची संधी लगेचच मिळते असे म्हटले जाते. पण हे ठाम चुकीचे आहे. कारण मी अभिनयक्षेत्रात येण्यासाठी अनेक ऑडिशन्स दिल्या आहेत. तसेच अनेक नकार देखील पचवले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. मी अभिनयक्षेत्राद्वारे माझ्या वडिलांचा अभिनय वारसा पुढे नेत आहे याचा मला आनंद होत आहे. 

बाजार या चित्रपटातील तुझ्या भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी केलीस?हा चित्रपट स्टॉक मार्केटशी संबंधित आहे. मला या क्षेत्रात रस असल्याने मला या भूमिकेसाठी वेगळा काही अभ्यास करावा लागला नाही. केवळ या चित्रपटात मी अलाहाबादमध्ये राहाणाऱ्या एका मुलाची भूमिका साकारत आहे. तेथील लोकांची हिंदी बोलण्याची ढब ही थोडी वेगळी असते. त्यामुळे मी त्यावर मेहनत घेतली. 

टॅग्स :रोहन मेहराबाजार