Join us  

Remembering SSR: माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला... म्हणत सुशांतसाठी क्रिती सॅननने लिहिली होती पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:45 PM

अभिनेत्री क्रिती सॅननने सुशांतच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. सुशांत व क्रिती कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हटले जाते.

ठळक मुद्देइन्स्टावर क्रितीने सुशांतसाठी एक पोस्ट लिहिली होती. तसेच सुशांतसोबत घालवलेल्या क्षणांचे सुंदर फोटोही शेअर केले होते.

काही तारखा कधीच विसरता येत नाहीत. बॉलिवूडप्रेमींसाठी 14 जून ही तारीख यापैकीच एक. आजची ही तारीख बॉलिवूडप्रेमींना एक भळभळती जखम देऊन गेली होती. गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) जगाला अलविदा म्हटले होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा सुशांत अचानक जग सोडून निघून गेला होता. (Sushant Singh Rajput Death Anniversary) कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणा-या सुशांतने काळासोबत लीड अ‍ॅक्टरपर्यंतचा पल्ला गाठला. आज सुशांतचा पहिला स्मृतीदिन.

अभिनेत्री क्रिती सॅननने सुशांतच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. सुशांत व क्रिती कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हटले जाते. अर्थात दोघांनीही कधीच याची कबुली दिली नाही. दोघांनी ‘राब्ता’ या सिनेमात एकत्र काम केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या होत्या. सुशांतला अखेरचा निरोप देताना क्रिती हजर होती.

इन्स्टावर क्रितीने सुशांतसाठी एक पोस्ट लिहिली होती. तसेच सुशांतसोबत घालवलेल्या क्षणांचे सुंदर फोटोही शेअर केले होते. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘सुश ... मला माहीत आहे तुझा तल्लख मेंदूच तुझा सर्वात चांगला मित्र आणि तुझा सर्वात वाईट शत्रू होता. परंतु, एक क्षण असा आला की, तुला जगण्यापेक्षा मृत्यू अधिक सोपा वाटला़ तुझ्या त्या कठीण काळात तुझ्यासोबत असे काही लोक असायला हवे होते, जे तुला मदत करू शकले असते.

जे लोक तुझ्यावर खूप प्रेम करतात त्यांना तू दूर करायला नको होते. तुला जो काही त्रास होत होता, तो मी दूर करू शकले असते तर... परंतु तसे काहीही मला करता आलेले नाही. माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला आहे आणि दुसऱ्या भागात तू सदैव जिवंत राहशील. मी कायम तुझ्या आनंदासाठी प्रार्थना केली आणि करत राहिन.’ 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतक्रिती सनॉन