आंतरराष्ट्रीय चित्रपट संगीतकार ए. आर. रेहमान जगातला आगळावेगळा प्रयोग करणार आहेत. होय,जगातील पहिला आभासी वास्तवावर आधारीत संगीतमय (व्हर्च्युअल रिअॅलिटी) चित्रपट घेऊन येण्याचा त्यांचा मानस आहे. गोव्यात एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलाच प्रयोग असेल, असे ते म्हणाले.
मी एक व्यावसायिक संगीतकार आहे. एक आव्हान म्हणूनच मी याकडे पाहतो आहे. एक केवळ प्रयोग आहे,आणि त्याकडे प्रयोग म्हणूनच पहिले पाहिजे. व्हर्च्युअल रिअॅलिटीचा माझा हा पहिलाच अनुभव आहे आणि त्याबद्दल मी कमालीचा उत्सूक आहे. या प्रोजेक्टबद्दल दिग्दर्शक शंकर यांच्याशी बोलणी सुरू आहेत, असे रेहमान यांनी सांगितले. ए. आर. रेहमान यांनी यापूवीर्ही अनेक चित्रपट संगीतासाठी नवनवे तंत्रज्ञान वापरले आहे. त्यासाठी नवनवे प्रयोगही केले आहेत. रेहमान हे जगप्रसिध्द भारतीय संगीतकार आहेत. जगभरातील विविध भाषेतील चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. 2008 मध्ये आलेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या इंग्रजी चित्रपटाला दिलेल्या संगीतासाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. दोन आॅस्कर, दोन ग्रॅर्मी, एक बाफ्टा, एक गोल्डन ग्लोब, चार राष्ट्रीय अशा 25 हून अधिक पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. फिल्म बाजारमध्ये यंदा प्रथमच व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आधारीत साईडबारची व्यवस्था केली आहे. याशिवाय तीन नॉलेज सिरीजमध्ये याचा उपयोग करण्यात आला. लेखक-निमार्ता-दिग्दर्शक मायकेल रेईवॅक, अमॅस्टरडॅमचे मिरजाम वोसमीर आणि अविनाश चंगा या तज्ज्ञांनी डिजिटल तंत्रज्ञान, निर्मिती तंत्रज्ञान आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी, थ्रीडी अॅनिमेशन आणि वास्तव संगीत या विषयावर चर्चा केली आहे.