Join us

'गोलमाल अगेन' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी केला हा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 15:49 IST

गोलमाल सिरीजचा आगामी सिनेमा 'गोलमाल अगेन'च्या पूर्वप्रसिद्धीला चांगलाच चेव फुटला आहे. गेल्या आठवड्यात सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झालेल्या या ...

गोलमाल सिरीजचा आगामी सिनेमा 'गोलमाल अगेन'च्या पूर्वप्रसिद्धीला चांगलाच चेव फुटला आहे. गेल्या आठवड्यात सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचा ट्रेलर २४ तासांपेक्षा कमी वेळात २० दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला असल्याचा विक्रम या चित्रपटाने नोंदवला आहे. शिवाय आता या चित्रपटाची वाढती प्रसिद्धी लक्षात घेता या सिनेमाने प्रदर्शनापूर्वी आणखीन एक विक्रम केला आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स तिकिट बुकिंगला एक महिन्यापूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी पेटीएमशी भागीदारी केली असून अशाप्रकारे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच होत असलेल्या तिकिट बुकिंगची ही पहिलीच वेळ असल्यामुळे भारतीय चित्रपट इतिहासात 'गोलमाल अगेन' चित्रपटाची नोंद करण्यात आली आहे.   दिवाळीच्या मुहूर्तावर हास्याची आतषबाजी करण्यास येत असलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरातील सिनेरसिकांचा या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळत असून प्रत्येकजण सिनेमागृहातील आपापली जागा भरून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. सिनेमाच्या तिकिट बुकिंगबद्दल रिलायन्स एन्टरटेन्टेन्मेंटचे एसआयओ शिबाशश सरकार असे सांगतात की, "सिनेमाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे पेटीएमने आमच्यासोबत सहयोग केला असून त्यांच्या सहकार्याने प्रथमच आम्ही फिल्म रिलीजच्या चार आठवड्यांपूर्वीच तिकीट बुकिंग सुरू करण्यास तयार झालो."एक महिन्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंग उघडणारा पहिला भारतीय चित्रपट असण्याविषयी 'गोलमाल अगेन' दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सांगितले की, "आमचा सिनेमा अशाप्रकारे लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत असल्याचे पाहून आनंद वाटतो आहे. प्रेक्षकदेखील प्रदर्शनापूर्वीच आगाऊ तिकीट विकत घेत आहेत. 'गोलमाल अगेन'ला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे मी खुश आहे'. गोलमाल अगेन या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमु, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, परिणिती चोप्रा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीचे आहे. गोलमालचे आजवरचे सगळेच सिरिज हिट गेले आहेत. Also Read : २६ वर्षे जुन्या स्टाईलमध्ये दिसला अजय देवगण!