Join us

सोनम कपूरच्या पतीला उचलून घेत रणवीर सिंगने केला डान्स, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 16:28 IST

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे बरेचसे व्हिडीओ समोर येत असून, त्यातील एका व्हिडीओमध्ये रणवीर चक्क आनंद आहुजाला कडेवर घेऊन डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूरने दिल्लीस्थित बिझनेसमॅन आनंद आहुजा याच्याशी लग्न केले. मंगळवारी दुपारी आनंद आणि सोनमचा पंजाबी रीतीरिवाजानुसार विवाह सोहळा पार पडला, तर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील लीला हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीची धूम बघावयास मिळाली. शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार, शाहीद कपूर यांच्यासह ऐश्वर्या राय-बच्चन, करिना कपूर-खान, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ यांसारख्या कलाकारांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती. सध्या या पार्टीतील बरेचसे इनसाइड व्हिडीओज् समोर आले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर सिंगच्या एनर्जीचे चांगलेच कौतुक केले जात आहे. होय, या व्हिडीओमध्ये तो चक्क सोनम कपूरचा पती आनंद आहुजाला कडेवर घेऊन डान्स करताना दिसत आहे. त्याच्या या अजब परफॉर्मन्समुळे उपस्थित गेस्टही काही काळ दंग राहिले.  रणवीर सिंगच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारणाºया अनिल कपूरसोबतही त्याने जोरदार डान्स केला. दोघेही बिंधास्त मूडमध्ये उपस्थितांचे मनोरंजन करताना दिसले. त्याचबरोबर रणवीर त्याचा खास मित्र आणि ‘गुंडे’मधील सहकारी अर्जुन कपूरसोबतही तुफान डान्स करताना दिसला. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्यापासून ते ‘ततड-ततड’ या गाण्यापर्यंत दोघांनी डान्स केला. एका खास व्हिडीओमध्ये तर रणवीर चक्क जमिनीवर बसून डान्स करताना दिसत आहे.  दरम्यान, रणवीर सध्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जोया अख्तरच्या या चित्रपटात तो आलिया भट्टसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटानंतर तो निर्माता रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या ‘सिम्बा’ हा चित्रपट करणार आहे. या चित्रपटात त्याच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान दिसणार आहे.