Join us  

पंजाबी सिनेमांचे ड्रग्ज कनेक्शन; प्रोड्यूसरच निघाला सप्लायर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 3:34 PM

मुंबई पोलिसांच्या अ‍ॅण्टी नारकोटिक्स सेलने पंजाबी सिनेमांच्या एका प्रोड्यूसरला मुंबईत ड्रग्ज विकताना अटक केली आहे; मात्र या प्रोड्यूसरच्या नावाचा ...

मुंबई पोलिसांच्या अ‍ॅण्टी नारकोटिक्स सेलने पंजाबी सिनेमांच्या एका प्रोड्यूसरला मुंबईत ड्रग्ज विकताना अटक केली आहे; मात्र या प्रोड्यूसरच्या नावाचा खुलासा फेब्रुवारी महिन्यात पकडलेल्या एनसीपीच्या एका नेत्याची चौकशी केल्यानंतर केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित आणखी एका यादविंदर सिंह बसराव ऊर्फ पिंकी ऊर्फ पाजी याला दिल्लीतून अटक केल्याने पंजाबी सिनेमांचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यादविंदर यांची ‘पिंकी’ नावाची प्रॉडक्शन कंपनी आहे. यादविंदर यांनी २००७ मध्ये गुरदास, मान, गुलशन ग्रोव्हर आणि ओम पुरी यांच्यासोबत ‘यारिया’ या पंजाबी सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या ते ‘शेर का पंजा’ या सिनेमावर काम करीत आहेत; मात्र सिनेमा पूर्ण होण्याअगोदरच यादविंदर यांचा खरा चेहरा समोर आल्याने, खळबळ उडाली आहे. यादविंदर यांच्या अटकेमुळे या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची पोलिसांकडून शक्यता वर्तविली आहे. मुंबई पोलीस प्रवक्ता पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले की, यादविंदर यांच्याकडून ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. तसेच यादविंदर यांनी ड्रग्ज कोठून आणले याचा शोध घेत असून, आणखी काही सप्लायर्सची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. यादविंदर याची अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असून, तिथे त्यांचा एक परिवार असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब येथील रहिवासी असलेले यादविंदर हे मुंबई, दिल्ली आणि चेन्नई येथील हॉटेलमध्ये नियमित मुक्काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यादविंदर यांच्या अटकेमुळे पंजाबी सिनेमांचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाले असून, आता हे नेटवर्क कुठपर्यंत आहे याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान असेल. त्याचबरोबर या सर्व प्रकरणांतील मास्टर माइंड कोण? ही माहिती समोर आणण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. गेल्यावर्षी रिलिज झालेल्या शाहिद-आलियाच्या ‘उडता पंजाब’ या सिनेमातून पंजाबमधील ड्रग्ज रॅकेटचे विदारक वास्तव दाखविण्यात आले होते.