Join us  

पिहूचा ट्रेलर पाहिल्यावर तुमच्या अंगावरही येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:36 PM

आपल्या आईच्या मृत्यूनंतर एक दोन वर्षांची चिमुकली काय काय करू शकते, कोणत्या परिस्थितीतून जाईल याचा विचार करणे देखील अवघड आहे. पण हीच परिस्थिती आपल्याला पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

पिहू या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून सोशल मीडियावर या ट्रेलरची चांगलीच चर्चा आहे. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे हा ट्रेलर पाहिल्यावरच लक्षात येत आहे. या चित्रपटात एका छोट्याशा मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे या ट्रेलरवरून लक्षात येत आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी हा ट्रेलर त्यांना खूप आवडत असल्याचे प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे.

पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केवळ एक छोटीशी मुलगी आपल्याला दिसत असली तरी या चित्रपटाची कथा अंगावर काटा आणणारी आहे. आपल्या आईच्या मृत्यूनंतर एक दोन वर्षांची चिमुकली काय काय करू शकते, कोणत्या परिस्थितीतून जाईल याचा विचार करणे देखील अवघड आहे. पण हीच परिस्थिती आपल्याला पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. पिहू या चित्रपटाच्या दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एक लहान मुलगी मोबाईलसोबत खेळताना, टिव्हीवर नृत्य पाहून नाचताना दिसत आहे. तसेच खेळत खेळत ती फ्रिजमध्ये देखील जाऊन बसते असे देखील पाहायला मिळत आहे. तिची आई बेडवर झोपलेली असून तिला उठलायचा ती प्रयत्न करत आहे. फोन घेऊन कोणाशी तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. भूक लागल्यानंतर दूध पिण्यासाठी ही चिमुरडी धडपडत आहे. कधी गॅस पेटवताना तर कधी मायक्रोव्हेव्हमध्ये काही तरी गरम करताना ती दिसत आहे. आपल्या आईचे निधन झाले असल्याची या मुलीला थोडीदेखील कल्पना नाहीये. आपल्या आईला सतत हाक देणारी चिमुकली, तिच्या पुढ्यात जाऊन झोपणारी चिमुकली हे पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा राहातो.

पिहू हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ पत्रकार विनोद काप्री यांनी केले आहे. तसेच रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मायरा विश्वकर्माने यात पिहू ही मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :पिहू