Join us  

ऋषी कपूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित होणार त्यांचा हा शेवटचा चित्रपट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:55 PM

ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट आता त्यांच्या फॅन्सना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव 'शर्माजी नमकीन' असं आहे.

ऋषी कपूर यांनी एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते. ३० एप्रिल २०२० ला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्याआधी दोन वर्षं अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये ते भारतात परतले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाचा त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले होते. त्यांचा अखेरचा चित्रपट आता त्यांच्या फॅन्सना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव 'शर्माजी नमकीन' असं आहे. हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. ऋषी कपूर यांचा वाढदिवस ४ सप्टेंबरला असतो. त्याचमुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच दिवशी त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

शर्माजी नमकीन या चित्रपटाचे ऋषी कपूर यांचे चित्रीकरण अर्धेच झाले होते. आता शिल्लक असलेले त्यांचे चित्रीकरण अभिनेता परेश रावल पूर्ण करणार आहे. शर्माजी नमकीनचे दिग्दर्शन हितेश भाटियाने केले असून या चित्रपटाचे लेखन हितेश भाटिया आणि सुप्रतीक सेन यांनी केले आहे. या चित्रपटात जुही चावला महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचे एक दशक गाजवले आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखों दिवाने आहेत. त्यांचा चाहतावर्ग त्यांना कायम मिस करतो. मेरा नाम जोकर’ म्हणत बालवयातच सिनेसृष्टीला ऋषी कपूर यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून दिली. कधी चॉकलेट हीरो तर कधी खलनायक अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या. काळानुरूप अभिनयासोबत दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले.

ऋषी कपूर यांनी १९७३ साली बॉबी सिनेमातून अभिनेता म्हणून सुरुवात केली. बॉबीसाठी त्यांना १९७४ साली सर्वश्रेष्ठ अभिनेता फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ साली त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंटसहित अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७१ मध्ये त्यांना पहिल्या सिनेमासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.

टॅग्स :ऋषी कपूर