Join us  

सुलभ शौचालय ते मुख्तार मिस्त्री...!  पक्की फिल्मी आहे पंकज त्रिपाठींची लव्हस्टोरी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 3:03 PM

अभिनेते पंकज त्रिपाठी यांची रिअल लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही.

ठळक मुद्देपंकज व मृदुला यांच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत. दोघांना एक मुलगी आहे.

आपल्या अदाकारीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांची रिअल लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंकज यांनी बराच संघर्ष केला. 2004 मध्ये ‘रन’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला. पण त्यांची ही भूमिका इतकी छोटी होती की, त्याच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. मात्र पंकज यांनी हार न पत्करता, मिळेल त्या भूमिका स्वीकारत आपला प्रवास सुरु ठेवला. अखेर 2012 मध्ये ‘गँग आॅफ वासेपूर’ मिळाला आणि पंकज त्रिपाठी यांना खरी ओळख मिळाली. या पंकज त्रिपाठींच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात ते त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना दिसताहेत.सुलभ शौचालय बनवण्या-या एका मिस्त्रीमुळे त्यांची ही लव्हस्टोरी सुरु झाली आणि त्याच्यामुळेच लग्नापर्यंत पोहोचली. होय, या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती ती सुलभ शौचालयापासून.

 कशी तर गोष्ट आहे 1992 सालची. त्यावर्षी मृदुला (पंकज यांची पत्नी) हिच्या गावात सुलभ शौचालय उभारले जात होते. या सुलभ शौचालयाचे इस्टिमेट घेण्यासाठी पंकज यांच्या गावचा मिस्त्री गेला होता. त्याचे नाव होते मुख्तार. तो इस्टिमेट देऊन परत आला आणि परतल्यावर गप्पात गप्पात  त्या गावात एक हरिणीसारखी मुलगी बघितल्याचे त्याने पंकज यांना सांगितले. झाले, या हरिणीसारख्या मुलीला कधी एकदा पाहतो, असे पंकज यांना झाले. त्यांना तशी संधी लवकरच मिळाली. 

योगायोगाने मृदूलाच्या गावातच पंकज यांच्या बहिणीचे लग्न जमले. तिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पंकज त्या गावात गेले. एकीकडे बहिणीचा साखरपुडा सुरु होता आणि दुसरीकडे पंकज यांचे डोळे त्या हरिणीसारख्या मुलीला शोधत होते. अचानक ती दिसली. पण हरिणीसारखी आली आणि तेवढ्याच चपळपणे दिसेनासी झाली. 

यानंतर  बहिणीच्या लग्नात मात्र ती हरिणी पंकज यांना दिसलीच. होय, ती तिच्या बाल्कनीत उभी होती. तिला पाहताच लग्न करेल तर हिच्याशीच हे पंकज यांनी ठरवून टाकले. ती कोण, कुठली, तिचे नाव काय, यापैकी पंकज यांना काहीही ठाऊक नव्हते. पण पहिल्याच नजरेत ते तिच्यावर भाळले होते. ती तीच होती, हरिणीसारखी मुलगी. तिचे नाव मृदुला. पंकज व मृदुला यांच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत. दोघांना एक मुलगी आहे.

टॅग्स :पंकज त्रिपाठी