Join us

​आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार ‘पडद्यावर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 13:02 IST

पाचशे व हजाराच्या नोटबंदीमुळे सध्या चर्चेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच आपण मोठ्या पडद्यावर पाहू शकू. म्हणजे नरेंद्र ...

पाचशे व हजाराच्या नोटबंदीमुळे सध्या चर्चेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच आपण मोठ्या पडद्यावर पाहू शकू. म्हणजे नरेंद्र मोदी अभिनय करणार की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नेमके तसे नाही. पण मोदी आणि त्यांचा विकास अजेंडा हा चित्रपटरूपात आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. होय, बिहारमधील दिग्दर्शक सुरेश झा यांनी हा चित्रपट साकारला आहे. तेच या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘मोदी का गाव’ असे या चित्रपटाचे नाव आहे. सव्वा दोन तासांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून तूर्तास पोस्टप्रॉडक्शनचे काम सुरु आहे.टीव्ही अभिनेता चंद्रमणि एम आणि जेबा ए या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. तर नरेंद्र मोदींसारखे दिसणारे मुंबईतील व्यावसायिक विकास महांते यांनी यात मोदींची भूमिका साकारली आहे. खरे तर हा चित्रपट बायोपिक नाही. पण या चित्रपटाचे ग्रॅण्ड प्रिमीयर करण्याचे झा यांनी ठरवले आहे. शिवाय यासाठी पंतप्रधानांना बोलवण्याचेही त्यांचे प्रयत्न आहेत. पाटणा, दरभंगा आणि मुंबई येथे चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण पार पडले.  हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होण्याची आणि बिग हीट ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सव्वा दोन तासांच्या या चित्रपटात सात गाणीही आहेत.  संगीतकार मनोजानंद चौधरी यांनी ही सात गाणी कंपोज केली आहेत. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला आणि देशात एकच खळबळ माजली. सध्या मोदींच्या या निर्णयावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे.