Join us  

 जेव्हा मौलवींच्या म्हणण्यावरून मोहम्मद रफींनी घेतला होता चित्रपटांसाठी न गाण्याचा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 2:34 PM

धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याचा झायरा वसीमचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. मी अल्लाहच्या मार्गावरून भरकटले होते, असे सांगत तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. पण धार्मिक कारणांनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेणारी झायरा एकटी नाही.

ठळक मुद्देकाही लोक ही घटना निव्वळ अफवा असल्याचे सांगतात. पण रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी ही घटना सत्य असल्याचे सांगितले.

धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याचा झायरा वसीमचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. मी अल्लाहच्या मार्गावरून भरकटले होते, असे सांगत तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. पण धार्मिक कारणांनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेणारी झायरा एकटी नाही. या यादीत विनोद खन्ना यांचेही नाव आहे. ओशोंच्या सानिध्यात आल्यानंतर विनोद खन्ना यांनी बॉलिवूड सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला होता. अर्थात पुढे त्यांनी हा निर्णय बदलला. असेच काही मोहम्मद रफी यांच्यासोबतही घडले होते.

सूरांचे बादशाह मोहम्मद रफी यांनी मौलवींच्या म्हणण्यावरून चित्रपटांसाठी न गाण्याचा निर्णय घेतला होता. पण लवकरच त्यांना हा निर्णय चुकीचा असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता. मोहम्मद रफी हज यात्रेला गेले होते, तेव्हाची ही घटना.हज यात्रेवरून परतल्यानंतर आता तुम्ही ‘हाजी’ आहात. त्यामुळे चित्रपटांसाठी तुम्ही गाऊ नये, असे मौलवींनी त्यांना सांगितले होते. रफी एक साधेसरळ व्यक्ती होते. मौलवींच्या सांगण्यावरून रफी यांनी चित्रपटांसाठी गाणी न गाण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात या घटनेबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. काही लोक ही घटना निव्वळ अफवा असल्याचे सांगतात. पण रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी ही घटना सत्य असल्याचे सांगितले. बीबीसीशी बोलताना शाहिद रफी यांनी या घटनेला दुजोरा दिला.

‘हो हे खरे आहे. इस्लामच्या म्हणण्यानुसार, माझ्या वडिलांनी एकेकाळी चित्रपटांत न गाण्याचा निर्णय घेतला होता. पण अल्लाहच्या कृपेने त्यांनी लवकरच हा निर्णय बदलला  होता,’असे त्यांनी सांगितले. त्यांनी या घटनेवर आणखी प्रकाश टाकला. ‘ही 1971 ची घटना आहे. माझे वडिल आणि माझी अम्मी दोघेही हजवर गेले होते. यानंतर तुम्ही आता हाजी आहात. तुम्ही चित्रपटांत गाऊ नये, असे तेथील मौलवींनी माझ्या वडिलांना सांगितले होते. त्यानुसार, भारतात परतल्यावर माझ्या वडिलांनी गाणी न गाण्याचा निर्णय घेतला होता,’असेही त्यांनी सांगितले.

रफी यांनी किती काळ गाणी गायली नाहीत आणि ते कसे परतले, असे विचारले असतान शाहिद रफी यांनी सांगितले की, त्यांनी किती काळ गाणी गायली नाहीत, हे नेमके आठवत नाही. पण नौशाद साहेबांनी आणि अनेकांनी त्यांना समजावले होते. यानंतर एका ब्रेकनंतर माझ्या वडिलांनी पुन्हा गायला सुरुवात केली.

टॅग्स :मोहम्मद रफी