Join us  

प्रभूदेवाने या अभिनेत्रीसाठी पत्नीला दिला होता घटस्फोट, पण या अभिनेत्रीनेच दिला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 2:57 PM

प्रभू देवाचे पहिले लग्न लता सोबत झाले असून 2010 मध्ये प्रभू देवा आणि या अभिनेत्रीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली.

ठळक मुद्देप्रभू देवाच्या व्यवसायिक आयुष्याप्रमाणेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. प्रभू देवाचे पहिले लग्न लता सोबत झाले. त्यांना तीन मुले असून त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचे निधन 2008 मध्ये कॅन्सरने झाले.

अभिनेता आणि बॉलिवूडचा टॉप कोरिओग्राफर प्रभू देवाला भारताचा ‘मायकल जॅक्सन’ म्हणूनही ओळखले जाते. त्याचा आज वाढदिवस असून त्याने एक दिग्दर्शक म्हणून देखील त्याची ओळख निर्माण केली आहे. प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याचा जन्म कर्नाटकमधील मैसूर येथील आहे. त्याचे वडील मुगूर सुंदर हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. त्याने त्यांच्याकडूनच लहानपणापासून नृत्याचे धडे गिरवले. 

प्रभू देवाचे वडील कोरिओग्राफर असले तरी त्याने त्यांची मदत कधीच घेतली नाही. करियरच्या सुरुवातीला अतिशय छोट्या भूमिकांमध्ये देखील तो झळकला. मौना रगम या चित्रपटाद्वारे त्याने या क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात केवळ एका गाण्यात काही क्षणांसाठी बासरी वाजवताना तो दिसला होता. त्यानंतर अग्नी नातचथिरम या चित्रपटात तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकला. कमल हासनच्या वेत्री विज्हा या चित्रपटात त्या॔ला पहिल्यांदा डान्स कोरिग्राफ करण्याची संधी मिळाली. कोरिग्राफी करत असतानाच तो अभिनयक्षेत्राकडे वळला.

प्रभू देवाच्या व्यवसायिक आयुष्याप्रमाणेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. प्रभू देवाचे पहिले लग्न लता सोबत झाले. त्यांना तीन मुले असून त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचे निधन 2008 मध्ये कॅन्सरने झाले. त्यानंतर दोनच वर्षांत प्रभू देवा आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली. नयनतारा आणि प्रभू देवा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा प्रभूदेवा विवाहित होता. तीन मुलांचा बाप होता. पण प्रेम आंधळे असते. त्यानुसार पत्नी आणि मुलांना सोडून प्रभू देवा नयनतारासोबत लीव्ह-इनमध्ये राहू लागला.

प्रभू देवाची पत्नी लताला ही गोष्ट कळली आणि तिने थेट फॅमिली कोर्टात धाव घेतली होती. नयनताराने माझ्या पतीशी लग्न केले तर मी उपोषणावर बसेल, अशी धमकीही लताने दिली होती. या प्रकरणाचा इतका बोभाटा झाला की, रस्त्यावर नयनताराचे पुतळे जाळले गेलेत. त्यामुळे आमच्यात असे काहीही नाही, असे नयनताराने सांगितले होते. पण प्रभू देवापासून दूर राहणे नयनताराला शक्य नव्हते. प्रभूदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मही स्वीकारला होता.

अखेर नयनतारासाठी प्रभूदेवाने एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते तोडत २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला. पोटगी म्हणून प्रभू देवाला १० लाख रूपये शिवाय २० ते २५ कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असे सगळे पत्नीला द्यावे लागले. यामुळे नयनताराचे प्रेम आपल्याला मिळेल, असा त्याचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसला. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभू देवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभू देवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले.

टॅग्स :प्रभू देवा