Join us  

जवानमधील किंग खानच्या विविध लूकवर नागपूर पोलिसांचं भन्नाट ट्वीट, वाचा काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 12:01 PM

'जवान'च्या मदतीने नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या ‘जवान’ चित्रपटाची  बरीच चर्चा आहे. हॉलीवूड असो वा बॉलीवूड, किंवा सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे असोत, प्रत्येकावर ‘जवान’ चित्रपटाचा प्रभाव पडला आहे. सोशल मीडियावर, तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या रीलवर एक रील ‘जवान’शी निगडीत पाहायला मिळेल. सोशल मीडियावर लोकं चित्रपटाचं कौतुक करताना थकत नाहीयेत. दुसरीकडे आता नागपूर पोलिसही 'जवान'पासून प्रेरित झाल्याचे दिसत आहे. 'जवान'च्या मदतीने नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूर शहर पोलिसांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे पोस्टर आहे. या पोस्टरमध्ये शाहरुख खान हा जवान चित्रपटात साकारलेल्या ५ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड सेट करणं असं असतं, असे पोस्टरवर लिहलेलं आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये पोलिसांनी म्हटलं की, 'जेव्हा तुम्ही असे पासवर्ड ठेवता, तेव्हा कोणताही फ्रॉडस्टर टिकू शकणार नाही'. 

नागपूर पोलिसांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. पोलिसांकडून अभिनव आणि विनोदी पद्धतीने लोकांना इशारा दिला जातो. त्यामुळे लोकांना नियम सहजपणे समजण्यासाठी मदत होते. यामुळे सोशल मीडियावर पोलिसांच्या या क्रिएटीव्हिटीची चर्चा होत आहे. यावर नेटकरी विविध कमेंट करत आहेत.

 एका व्यक्तीने कमेंट केली, 'लक्षात ठेवा, ऑनलाइन सुरक्षेसाठी तुमचे पासवर्ड हे जवानमधील किंग खानच्या लुकप्रमाणे वेगवेगळे ठेवा'. तर दुसऱ्या एक युजरने नागपूर पोलिसांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, 'जवानचा वापर करून जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद'. ‘जवान’चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. यातील गाणी, स्टाइल, कथा, पात्र या सर्वांचीच सर्वत्र जोरदार चर्चा होते आहे.

 

 

 

 

टॅग्स :शाहरुख खानजवान चित्रपटनागपूर पोलीस